Jayant Patil News : महाविकास आघाडीतील तीनही पक्ष व इतर मित्र पक्षांची आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच एकत्रित बैठक आयोजित केली जाईल. सर्वच पक्ष पक्षांतर्गत चाचपणी करत आहेत. अशा पक्षस्तरीय प्रक्रिया पूर्ण करून ही बैठक बोलावली जाणार असल्याचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राष्ट्रवादी भवन, मुंबई इथे झालेल्या आढावा बैठकीची माहिती जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने ज्या लोकसभेच्या जागा लढवल्या त्या मतदारसंघांमधील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पक्षाच्या सद्यस्थितीचा आढावा बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या आढावा बैठकीचा उर्वरीत टप्पा उद्या पूर्ण करण्यात येईल. ही आढावा बैठक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिला टप्पा आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच राजकीय वर्तुळात शिंदे गटातील बरेच खासदार हे शिंदेंच्या तिकीटावर आगामी लोकसभा निवडणुकीत उभे राहू इच्छित नाहीत, अशा चर्चा सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले. अनेकांना भाजपच्या (BJP) तिकीटावर उभे राहण्याची इच्छा आहे. असे झाल्यास महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेला शिवसैनिक पुन्हा मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे यांच्याकडे जाईल, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, पाटील यांनी यावेळी कुस्तीपटूंच्या आंदोलनावरुनही केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, आपल्या देशाच्या वतीने जागतिक स्तरावर विशेष कामगिरी बजावलेल्या, सुवर्ण पदक मिळवलेल्या महिला खेळाडूंना रस्त्यावर पाडून पोलिस त्यांच्यावर बूटाने पाय ठेवतात, एवढा निर्घृण आणि अत्यंत लाजिरवाणा प्रकार भारतात यापूर्वी कधीही घडला नाही, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
तालुका, जिल्हा पातळीवरील खेळाडूंनाही गावात आपुलकी असते. जे खेळाडू आंदोलन करत आहेत ते जागतिक दर्जाचे आहेत. त्यांना देण्यात येणारी वागणूक अत्यंत निषेधार्ह आहे. देशातील सत्ता ज्यांच्या हाती आहे ते किती असंवेदनशील झाले आहेत, याचे पुरावे देशातील खेळाडूंसमोर आहेत, अशी टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. महिला खेळाडूंना देण्यात आलेल्या वागणुकीमुळे सर्वच क्षेत्रातील खेळाडू देशातील सरकारचा निषेध व्यक्त करत आहेत, असे सांगत घडलेल्या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध व्यक्त केला, असे जयंत पाटील म्हणाले.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.