Ashish Shelar, Uddhav Thackeray, Jayant Patil Sarkarnama
मुंबई

BJP Vs Shivsena : शेकापच्या जयंत पाटलांचा ठाकरे गटानं गेम केला? भाजपचा आरोप काय?

Ashish Shelar On Shiv Sena Uddhav Thackeray Group : विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना विजयी करण्यातदेखील उद्धव ठाकरेंची रणनीती कामी आली.

Jagdish Patil

Mumbai News, 13 July : नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत महायुतीने चांगली कामगिरी केली.

शिवाय या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना विजयी करण्यातदेखील उद्धव ठाकरेंची रणनीती कामी आली. मात्र, नार्वेकरांना विजयी करणाऱ्या ठाकरे गटानेच शेकापच्या जयंत पाटलांचा गेम करणार अशी टीका भाजपकडून सतत केली जात होती.

अशातच आता जयंत पाटील यांचा पराभव आणि नार्वेकरांचा विजय झाल्यामुळे भाजपच्या (BJP) या दाव्यात बळ आलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटाने जयंत पाटील यांचा ठरवून पराभव केल्याचा आरोप केला आहे.

आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन विधान परिषद निवडणूकीत विजयी झालेल्या भाजपच्या उमेदवारांचं अभिनंदन करण्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भाजपच्या विजयी उमेदवारांचं अभिनंदन करत ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

शेलार यांनी एक्सवर लिहिलं आहे, "विधान परिषद निवडणूकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी. सर्व विजेत्या उमेदवारांचे अभिनंदन, महाराष्ट्र पाहतोय. लोकसभा निवडणुकीत उबाठाने स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींना मदत केली नाही. मुंबई शिक्षक मतदारसंघात महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील यांच्या उमेदवाराचा उबाठाने पराभव केला. (गम्मत म्हणजे कपिल पाटीलांच्या समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापनाच श्रीमान उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली होती.)

तर आता विधान परिषद निवडणुकीत ही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापचे उमेदवार शेतकरी नेते जयंत पाटील यांचा उबाठाने ठरवून पराभव केला. सोबत असलेल्या छोट्या पक्षांना संपवण्याचे काम कोण करतोय? महाराष्ट्र पाहतोय! छोट्या पक्षांनो तुम्ही अजगराच्या विळख्यात सापडला आहात."

असं ट्विट करत शेलार यांनी ठाकरे गट छोट्या पक्षांना संपवत असल्याचा आरोप केला आहे. शिवाय जयंत पाटलांचा पराभव देखील ठाकरे यांनी ठरवून केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता यावर ठाकरे गट काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT