Supriya Sule, Jayant Patil, Sachin Waze Sarkarnama
मुंबई

Supriya Sule : फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात जयंत पाटलांचं नाव, वाझेच्या आरोपावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...

Jagdish Patil

Mumbai News, 01 August : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेला माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) याने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप सचिन वाझेने केला आहे. शिवाय यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचंदेखील नाव घेतलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

मात्र, अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विरोधातील एकही आरोप सिद्ध झालेला नसताना आता आणखी बाकीच्या लोकांची नावं या प्रकरणात येणं हा बालिशपणा आहे. आपल्या राज्याचं दुर्देव आहे की, राजकारण या पातळीवर आलं आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी वाझे यांच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

हे सगळे आरोप ऐन विधानसभेच्या तोंडावर का उपस्थित केले जात आहेत? असा प्रश्न उपस्थित करुन हा सगळा बालिशपणा सुरु असून अत्यंत गलिच्छ पद्धतीचं राजकारण भाजपकडून सुरु असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली.

त्या म्हणाल्या, "या पत्राचं आणि नावांची टायमिंग बघा. दोन महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका आहेत. दहा वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांची सत्ता असतानाही या गोष्टी आत्ताच कशा समोर येतात. मागील अडीच वर्ष त्यांचंच सरकार राज्यात सत्तेत आहे मग आताचं हे आरोप, पत्र आणि प्रत्यारोप का केले जात आहेत?

देशमुखसाहेबांच्या विरोधातील एकही आरोप सिद्ध झालेल नाही. सगळे आरोप खोटे ठरले आहेत. शंभर कोटींचा हिशेब कुठेच नाहीये. अशातच बाकीच्या लोकांची नावं या प्रकरणात घेणं हा खूपच बालिशपणा आहे. राज्याचं दुर्देव आहे की राजकारण अशा लेव्हलला आलं आहे." अशा शब्दात सुळे यांनी राज्य सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

तसंच, राज्याची आर्थिक परिस्थिती, महागाई बेरोजगारी यावर कोणीतरी बोललं पाहिजे. भ्रष्टाचाऱ्यांना झाकायंच वॉशिंग मशीन त्यांच्याकडे आहे. मात्र, आमचा पक्ष सुसंस्कृत आहे. आम्ही आरोप कधीच करत नाही. असलं गलिच्छ राजकारण करत नाही. सेवेसाठी राजकारणात आलो आहे.

बदला वगैरे असल्या गलिच्छ गोष्टीसाठी राजकारणात आलो नसल्याचं सुळे म्हणाल्या. तर ज्यांनी आरोपे केले ते आज कुठे गेले. भाजपची स्टाईल आहे आरोप करायचे आणि नंतर त्याच लोकांना पक्षात घ्यायचं आज ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे यांच्याबरोबर सत्तेत आहेत, असंही सुळे यांनी म्हटलं.

वाझेचे आरोप काय?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे स्वीय सहाय्यकाच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. याचे पुरावे मी 'सीबीआय'कडे दिले आहेत. याबाबत मी देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं असून देशमुखांबाबतचे सर्व पुरावे मी त्यांना दिले आहेत. मी नार्को टेस्टला तयार आहे. फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील यांचंही नाव आहे, असं वाझे याने म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT