Jitendra Awhad-Sunil Kedar
Jitendra Awhad-Sunil Kedar sarkarnama
मुंबई

आव्हाड आणि केदार यांचा वाद असा रंगला की मुख्यमंत्री म्हणाले, `शोले`प्रमाणे टाॅस उडवू!

संजय मिस्किन

मुंबई : राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार असल्याने यातील वादाच्या, कुरघोडीच्या बातम्या नेहमीच येत असतात. या वादाचे पडसाद कधीकधी मंत्रीमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत उमटतात. शेवटी मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासारखे वरिष्ठ नेते हस्तक्षेप करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतात. पण दोन पक्षांतील दोन मंत्र्यांमधील वादाचा प्रसंग मिश्किलीप्रमाणे घेण्याचा कधीकधी योग कॅबिनेट बैठकीत येतो. तसा तो 19 मे रोजी झालेल्या बैठकीत आला.

माजी क्रिकेटपटू सुनील गावसक (Sunil Gavaskar) यांना क्रिकेट अकादमीसाठी दिलेला भूखंड सरकारने परत घेतला. मात्र या भुखंडावरून महाविकास आघाडीत अतूट मैत्री असलेल्या दोन मंत्र्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोरच ताबाहक्कावरून सामना रंगला. आपापल्या विभागाकडेच हा भूखंड राहावा यावरुन या दोन जिवलग मित्रांमध्ये झालेल्या जुगलबंदीचा सर्वच मंत्र्यांनी मिश्किल शैलीत आनंद घेतला.


सुनील गावसकर यांना ‘म्हाडा’ने ३३ वर्षांपूर्वी क्रिकेट अकादमी स्थापन करण्यासाठी बांद्रा येथे भूखंड दिला होता. मात्र ३३ वर्षात या भूखंडावर अकादमी उभी करण्यात गावसकर यांना यश आले नाही. यामुळे म्हाडाने हा भूखंड मागील आठवड्यात परत घेतला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतची घोषणा केली. याचाच धागा पकडत युवा व क्रिडा कल्याण विभागाचे मंत्री सुनील केदार यांनी मुख्यमंत्र्यांना हा भूखंड खेळासाठी दिला असल्याने तो क्रिडा विभागाला द्यावा, अशी थेट मागणी केली. या भूखंडावर क्रिडा विभाग सर्वोत्तम प्रशिक्षणासाठी स्टेडिअम उभे करू शकते, असा दावा केदार यांनी केला. मित्र असलेल्या केदार यांची मागणी ऐकताच मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा भूखंड म्हाडाचा आहे. आम्ही तिथे म्हाडाच्या वतीने स्टेडिअम उभारणार आहोत, असे सांगितले. त्यावर, म्हाडाचे काम घरे बांधणे आहे. स्टेडिअम बांधणे हे क्रिडा विभागाचे काम आहे, अशी कोपरखळी सुनील केदार यांनी लगावली.

‘शोले’सारखा टॉस करावा लागणार काय?
तुम्ही दोघे मित्र मंत्री म्हणून इथे बोलत असला तरी बाहेर गेल्यावर गळ्यात गळे घालून फिरणार, हे माहीत आहे, अशी टिप्पणी करत, तुमच्या या वादावर आता आम्हालाही ‘शोले’ चित्रपटातील जय अन् विरूसारखा टॉस करावा लागणार काय, असा मार्मिक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावत या चर्चेवर पडदा टाकला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT