Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad : ‘पोलिसांना ‘हे’ प्रश्न विचारल्यामुळे माझ्यावर गुन्हा’; ‘तो’ हाय व्होल्टेज ड्रामा अन्‌ मारहाण करणाऱ्यांची नावेही आव्हाडांनी दिली

MLA's Supporter Clash: आंदोलन करणे, हा आमचा संविधानिक अधिकार आहे. लोकशाहीने दिलेला अधिकार वापरत आम्ही आंदोलन केले. त्यांना आमच्यावर गुन्हा दाखल करायचा असेल, त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करावा.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 18 July : विधीमंडळाच्या आवारात गुरुवारी (ता. 17 जुलै) सायंकाळी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. आव्हाडांचे समर्थक नितीन देशमुख यांना मारहाण झाली होती. मात्र, रात्री उशिरा देशमुखांना अटक करण्यात आली. त्यानंतर आव्हाडांनी पोलिसांच्या गाडीसमोर आंदोलन केले. त्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आव्हाडांनी माध्यमांसमोर बोलताना मारहाणीपासून रात्रीचा संपूर्ण हायव्होल्टेज ड्रामा मांडला. तसेच, मारहाण करणारे पाच जणांची नावेही सांगितली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, संबंधित आमदार (गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता) हे सोबतच्या गुंडांना खुणावतो. त्यानंतर नितीन देशमुखांना मारहाण केली जाते. मारहाण करणारे किती होते, हे सर्वांनी पाहिले आहे. दोघांना पकडले जाते. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष सांगतात की, नितीन देशमुख यांना रात्री सोडून देण्यात येईल. सचिवही सोडून देण्यात येईल, असे सांगतात.

रात्री उशिरा नितीन देशमुखांना (Nitin Deshmukh) अटक करण्यात आल्याचा मला फोन आला, त्यानंतर मी पुन्हा विधीमंडळाच्या आवारात आलो, त्या वेळी पोलिसांनी सांगितले की, देशमुखांना घेऊन पोलिस ठाण्यात जावा, एवढाच आदेश आम्हाला देण्यात आलेला आहे. आम्हाला कोणतीही माहिती नाही, पण आम्ही देशमुखांना अटक केली आहे, असे पोलिस सांगत होते, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.

आंदोलन करणे, हा आमचा संविधानिक अधिकार आहे. लोकशाहीने दिलेला अधिकार वापरत आम्ही आंदोलन केले. त्यांना आमच्यावर गुन्हा दाखल करायचा असेल, त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करावा. पण, विधानभवनात एक आमदार खुणवतो, त्यानंतर पाच जण मारहाण करतात, असे सांगून आव्हाड यांनी मारहाण करणाऱ्या पाच जणांची नावे सांगितली.

गणेश विठ्ठल भूते (रा. विंगेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली), हृषीकेश टकले, महादेव पाटील (रा. वनपुरी, ता. आटपाडी), कृष्णा रासकर, लक्ष्मण जगदोंड हे पाच जण मारायला असताना तुम्ही एकाला अटक केली. दोघांना ताब्यात घेतलं आणि शेवटी पोलिस ठाण्याला एकच गेला. दुसरा कुठे गेला? हे प्रश्न मी पोलिसांना विचारले, तर पोलिसांनी माझ्यावरच गुन्हा दाखल केला. गेली ४० वर्षे आंदोलनात आमचं आयुष्य गेलेले आहे. त्यामुळे या गुन्ह्याने मला धक्का वगैरे बसलेला नाही, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.

विधानभवनात फक्त आमदारांनाच सोडा, अशी आमची पहिल्यापासून मागणी आहे. पाच जण एकत्र उभे होते. संबंधित आमदार तेथेच उभे आहेत, त्यांच्या खुनेनंतर मारहाणीचा प्रकार होतो. देशमुखांवर ठरवून हल्ला झाला आहे. मकोकाचा आरोपी, खुनाचा आरोपी, पाच पाच जण एकत्र गॅंगअप करून राहणार असाल, त्यानंतर मारहाण करणार असाल तर आम्हीसुद्धा सुरक्षित नाही, अशी खंतही आव्हाड यांनी बोलून दाखवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT