Jitendra Awhad Controversy Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad : शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध अन् संभाजी महाराजांच्या हत्येचा कट रचणारे सनातनी दहशतवादीच; आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य

Sanatani Terrorism Remark : "होय, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल, सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही; तर, ते प्राचीन काळापासून आहे", असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हिंदुत्ववाद्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 03 Aug : "होय, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल, सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही; तर, ते प्राचीन काळापासून आहे", असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हिंदुत्ववाद्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या ट्विटमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

नुकतंच मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागला. त्यानंतर महायुती आणि हिंदुत्ववाद्यांनी भगवा दहशतवाद या शब्दावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला. हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाहीत, असंही मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी वक्तव्य केली आहेत.

याच निकालावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून चव्हाण यांच्याविरोधात मुंबईत आंदोलन देखील करण्यात आलं.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "भाजपच्या लोकांनी असेल किंवा आमच्या काँग्रेसच्या लोकांनी असेल कृपया भगवा शब्दाचा वापर करू नका. महाराष्ट्रात आमच्या करता भगवा पवित्र, स्वातंत्र्य लढ्याचे प्रतिक आहे. स्वातंत्र मिळण्याच्या साडेतीनशे वर्ष आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढ्याचा हा ध्वज आहे.'

भगवा रंग संत ज्ञानेश्वर संत तुकाराम वारकरी पंथाचा रंग आहे. तो महाराष्ट्राला प्रिय आहे. त्याला कोणी पॉलिटिकल लेबल कृपा करून देऊ नका. म्हणायचे असेल तर सनातनी म्हणा, हिंदुत्वावदी म्हणा. भगवा म्हणू नका ही माझी विनंती आहे.", असं चव्हाण यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टमुळे आता वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय?

जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं की, होय, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल. सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही; तर, ते प्राचीन काळापासून आहे. भगवान बुद्धाला छळणारे हे सनातनी दहशतवादीच होते. बौद्ध भिक्खूंना मारणारे तत्कालीन सनातनी दहशतवादीच होते. चार्वाकाला मारणारे सनातनी दहशतवादीच होते. बसवेश्वरांना मारणारे सनातनी दहशतवादीच होते.

संत ज्ञानेश्वरांना छळणारे सनातनी दहशतवादीच होते, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. त्यांनी पुढे लिहिलं की, संत तुकारामांचा छळ करून त्यांच्या गाथा बुडवणारे सनातनी दहशतवादीच होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, तुम्हाला राजे म्हणवून घेण्याचा अधिकारच नाही, असे म्हणत त्यांची हेटाळणी करणारे सनातनी दहशतवादीच होते. शत्रूशी हातमिळवणी करून छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा कट रचणारे सनातनी दहशतवादीच होते.

त्यांना शत्रूच्या हातात पकडून देणारेही सनातनी दहशतवादीच होते, असं त्यांनी लिहिलं आहे. दरम्यान, यावेळी महात्मा फुलेंवर सामाजिक बहिष्कार टाकून त्यांच्या खूनाची सुपारी देऊन मारेकरी घालणारे सनातनी दहशतवादीच होते. स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या आद्यशिक्षिका सावित्रीमाई फुले यांच्यावर शेणगोटे मारणारे सनातनी दहशतवादीच होते.

छत्रपती शाहू महाराजांना बदनाम करणारे, त्यांच्या खुनाचा प्रयत्न करणारे सनातनी दहशतवादीच होते. एका वर्गाला शूद्र ठरवून त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखणारे सनातनी दहशतवादीच होते. माणसाला माणूस म्हणून जगूच द्यायचे नाही; शूद्रांना पाण्यापासून वंचित ठेवणारे सनातनी दहशतवादीच होते. आगरकर हे केवळ सनातनी प्रवृत्तीविरोधात होते म्हणून त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला. त्यांना मारण्याचा प्रयत्न करणारे सनातनी दहशतवादीच होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गाच्या बाहेर बसवणारे आणि ते शिक्षणापासून वंचित कसे राहतील, याचा प्रयत्न करणारे सनातनी दहशतवादीच होते. महात्मा गांधी यांच्यावर अनेकदा हल्ले करणारे आणि प्रार्थनेला जाणाऱ्या निशस्र महात्म्यावर गोळ्या झाडणारे सनातनी दहशतवादीच होते. अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी झगडणारे नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणारे सनातनी दहशतवादीच होते.

सामाजिक समतेसाठी लढणाऱ्या गोविंद पानसरे यांचा खून करणारे सनातनी दहशतवादीच होते. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या समाजसुधारणेच्या कार्याला संपविण्यासाठी त्यांना ठार मारणारे सनातनी दहशतवादीच होते. स्त्रियांना या समाजात स्थानच नाही. त्या केवळ उपभोगाच्या वस्तू आहेत, असे मानणारे सनातनी दहशतवादीच होते.

आपली आई उपभोगण्याची वस्तू आहे, असे मानणारे सनातनी दहशतवादीच होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान ज्या सनातनी दहशतवादाविरोधात होते, त्या मनुस्मृतीला आपले संविधान मानणारे सनातनी दहशतवादीच होते. या सनातनी दहशतवादानेच भारताला जातीव्यवस्थेत ढकलले अन् सनातन्यांनीच देशात विषमतावादी वर्णव्यवस्था लादली.

अशांना सनातनी दहशतवादी म्हणायचे नाही तर काय म्हणायचे? 'सनातनी दहशतवाद' हा शब्द मागील हजारो वर्ष अस्तित्वात होता अन् पुढील हजारो वर्ष अस्तित्वात राहिल. जोपर्यंत जातीव्यवस्था-वर्णव्यवस्था आहे, तोपर्यंत सनातनी दहशतवाद विसरताच येणार नाही, असं आव्हाडांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT