Delkar Family  sarkarnama
मुंबई

ठाकरेंची जोरदार खेळी : डेलकर कुटुंबियांचा सेनेत प्रवेश; भाजपला थेट आव्हान

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेने भाजप विरोधात जोरदार खेळी आज केली. दादरा हवेली लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार मोहन डेलकर (Mohan Delkar) यांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव डेलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत या वेळी उपस्थित होते.

दिवंगत खासदार डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली होती. तसेच गुजरातमधील काही भाजप नेत्यांना आत्महत्येसाठी कारणीभूत ठरविले होते. याची चौकशी करण्याची मागणी डेलकर कुटुंबियांनी महाराष्ट्र सरकारकडे केली होती. त्यासाठी खास पथकही नेमण्यात आले होते.

डेलकर यांच्या मृत्यूनंतर तेथे आता पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून मोहन डेलकर हे सात वेळा निवडून आले होते. कधी भाजपकडून तर कधी काॅंग्रेसकडून ते खासदार झाले होते. 2019 मध्ये ते अपक्ष निवडून आले होते. या मतदारसंघात भाजपने महेश गावित यांना उमेदवारी दिली आहे. आता डेलकर यांच्या पत्नी सेनेकडून उमेदवार असल्याने काॅंग्रेस येथे आपला उमेदवार देणार का, याची उत्सुकता असणार आहे.

शिवसेनाप्रवेशाच्या वेळी बोलताना कलाबेन यांनी शिवसेना आपल्या भागात घेऊन जाणार असल्याची भावना व्यक्त केली. शिवसेनेत प्रवेश केल्याचा मला आंनद आहे. मला मदत करण्याचा उद्धव ठाकरे यांनी विश्वास दिला आहे. माझ्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी मी लढणार आहे. उद्धवजी हे प्रचारासाठी आमच्या भागात येणार असल्याचा आनंद आहे.

अभिनव डेलकर म्हणाले की महाराष्ट्राचा जसा विकास होत आहे तसा आमच्या प्रदेशाचा विकासही होईल हा विश्वास असल्यामुळेच शिवसेनेत प्रवेश केला आहे. आम्ही ज्या परिस्थितीतून जात आहोत ते पाहून उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी दादर नगर हवेली येथे खासदार शिवसेनेचा असेल. माझ्या वडिलांनी दिलेला शब्द आणि प्रदेश विकास यासाठी आमची लढाई आहे. आम्ही कोणाला घाबरणार नाही. आम्ही आमच्या लोकांसाठी लढत राहू. माझ्या आईला खासदार म्हणून कामाचा अनुभव आहे. माझ्या वडिलांसोबत त्यांनी काम केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT