Rashmi Thackeray, Kalaben Delkar 
मुंबई

शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेरील पहिल्या खासदारांचं जंगी स्वागत

कलाबेन डेलकर तब्बल ५१ हजार मतांनी विजयी झाल्या आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : दादरा-नगर हवेली केंद्रशासित प्रदेशामधील (Dadra Nagar Haveli Union Territory) पोटनिवडणूकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) तब्बल ५१ हजार मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांच्या रुपाने शिवसेनेला महाराष्ट्राबाहेरील पहिला खासदार मिळाला आहे. त्यामुळं शिवसेनेसाठी हा विजय महत्वाचा मानला जात आहे. या विजयाने भारावलेल्या शिवसेनेकडून बुधवारी डेलकर यांचं बुधवारी जंगी स्वागत करण्यात आलं.

कलाबेन डेलकर यांना १ लाख १६ हजार ८३४ मत मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार महेशभाई गावित यांना ६६ हजार १५७ मत मिळाली आहेत. या ऐतिहासिक विजयानंतर डेलकर यांनी बुधवारी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. यावेळी रश्मी ठाकरे यांनी डेलकर यांचे औक्षण केलं. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, श्रीरंग बारणे, अनिल देसाई आदी नेते उपस्थित होते.

यानंतर माध्यमांशी बोलताना कलाबेन डेलकर म्हणाल्या, शिवसेना परिवार, मोहन डेलकर आणि प्रदेशातील लोकांच्या आशीर्वादाने मोठ्या मताधिक्यानं विजय मिळाला. उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी आले आहे. आता निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. हे मुद्दे घेऊनच आता पुढे जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आमच्या प्रदेशात येण्याचे आश्वासन दिल्याचेही डेलकर यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्याबाहेर पहिला खासदार करण्याच्या निर्धाराने शिवसेनेने देखील ही जागा प्रतिष्ठेची केली होती. या विजयासह लोकसभेत शिवसेनेचे आता १९ खासदार झाले आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेनजीक असलेल्या दादरा-नगर हवेली या मतदारसंघाचे सातवेळा खासदार राहिलेले मोहन डेलकर यांनी यावर्षी २२ फेब्रुवारी रोजी मुंबईत मरीन ड्राईव्हवरील एका हॉटेलात गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत दादरा-नगर हवेलीचे प्रशासक प्रफूल्ल खेडा पटेल यांच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद करून ठेवले होते. त्याआधारे मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. त्यांच्या निधनानंतर तिथं सध्या पोटनिवडणूक जाहिर झाली होती.

१९८९ ला डेलकर हे प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. नंतर १९९१ आणि १९९६ ला ते कॉंग्रेसचे खासदार होते. तर, १९९८, १९९९ आणि २००४ ला भाजपकडून खासदार झाले. २००९ ला त्यांनी पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ ला मात्र, कॉंग्रेसकडून न लढता पुन्हा अपक्ष म्हणून लढले व निवडूनही आले होते. त्यांच्या निधनानंतर मागच्या महिन्यात ७ तारखेला स्व. डेलकरांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव यांनी मुंबईत येऊन मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर लगेचच कलाबेन यांना दादरा-नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT