Kalyan NCP  Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar : पहिल्यांदाच कल्याणमध्ये आलेल्या अजितदादांच्या स्वागताला रिकाम्या खुर्च्या; सभेला तुरळक गर्दी

सरकारनामा ब्यूरो

भाग्यश्री प्रधान आचार्य

Kalyan News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवारांकडून राज्यभरात दौरे सुरू केले आहेत. तालुका, जिल्हास्तरावरील कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने रविवारी कल्याण तालुक्यात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. सकाळी दहा वाजता मेळाव्याची वेळ होती. त्यासाठी सहा हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पण दुपारचे बारा वाजले तरी तुरळकच गर्दी असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार रेस्ट हाऊसमध्येच थांबून राहिल्याची चर्चा आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी (NCP) अजित पवार (Ajit Pawar) गटाचे कल्याण ग्रामीणचे अध्यक्ष भाऊ गोंधळी यांनी अजित पवार आल्यानंतर त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते येतील, असे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तर आमदार दौलत दरोडा यांनी देखील कार्यकर्ता मेळावा यशस्वी होणार असल्याची आशा व्यक्त केली आहे.

अजितदादा पहिल्यांदाच कल्याण मध्ये....

महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात झालेल्या राजकीय भूकंपानंतर आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा खांद्यावर आल्यानंतर कल्याण तालुक्यात अजित पवार पहिल्यांदाच आले आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अजित पवार समवेतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख नेते सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, आमदार दौलत दरोडा, युवा नेते पार्थ पवार, कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, प्रदेश सरचिटणीस आणि अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश निरीक्षक नजीब मुल्ला उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वरप गावात भव्य मंडप...

कल्याण मुरबाड मार्गावरील वरप गावात हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा होत आहे. या गावात भव्य मंडप टाकण्यात आला आहे. सहा हजार खुर्च्या टाकण्यात आल्या आहेत. आगामी निवडणुकीची मोर्चेबांधणी आणि ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा ठरेल अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगलेली पाहिला मिळत आहे.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT