Bhimashankar Tree Cutting | Sayaji Shinde | Torrent Project Sarkarnama
मुंबई

Sayaji Shinde News : "मुख्यमंत्र्यांना सह्याद्रीचे वाळवंट करायचं आहे का? कायदे, नियम बदला..."; सयाजी शिंदेंचं जनतेला आवाहन, म्हणाले "सर्वांनी पेटून उठा..."

Sayaji Shinde on Torrent Power Project : "भारताच्या जंगलांच्या एकूण क्षेत्रापैकी पाच टक्के जंगल आपल्या सह्याद्रीत आहे. तिथून सगळ्या नद्या वाहतात आणि त्यावरच संपूर्ण महाराष्ट्र जगत आहे. शिवाय झाडांमुळेच पाऊस येतो आणि डोंगरांमुळे तो अडवला जातो. अशा ठिकाणी प्रकल्प येत आहेत. त्यातील पहिला प्रकल्प म्हणजे टोरेंट प्रकल्प."

Jagdish Patil

Bhimashankar Forest News : कर्जतमधील वृक्षतोडीला राज्यभरातून तीव्र विरोध होत आहे. जुनी आणि मोठमोठी झाडे तोडून सरकार कसला विकास करत आहे? असा सवाल पर्यावरणप्रेमींसह सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र, दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोरेंट पॉवर कंपनीचा जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्प हा राज्याच्या हिताचा असल्याचा दावा केला आहे.

अशातच आता सह्याद्री देवराईच्या माध्यमातून पर्यावरणासाठी काम करणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी कर्जत आणि भीमाशंकर अभयारण्य परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीवरून संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी राज्य सरकारकडे मोठी विनंती केली आहे.

"भारताच्या जंगलांच्या एकूण क्षेत्रापैकी पाच टक्के जंगल आपल्या सह्याद्रीत आहे. तिथून सगळ्या नद्या वाहतात आणि त्यावरच संपूर्ण महाराष्ट्र जगत आहे. शिवाय झाडांमुळेच पाऊस येतो आणि डोंगरांमुळे तो अडवला जातो. अशा ठिकाणी प्रकल्प येत आहेत. त्यातील पहिला प्रकल्प म्हणजे टोरेंट प्रकल्प. यासाठी ६०० एकर जमीन दिली जाते आणि त्यातील झाडे तोडली जातात.

मी मुख्यमंत्र्यांना अगदी विनंतीपूर्वक सांगतो की, त्यांनी ७१ हजार कोटींची गुंतवणूक, ३० हजार कोटींचा काहीतरी फायदा आणि निर्माण होणारी वीज यांचा विचार केला पाहिजे. पण ही वीज कुणासाठी? त्या झाडांसाठी, तिथल्या नागांसाठी, मोरांसाठी आणि माशांच्या ५० प्रजातींसाठी मला उभे राहायचे आहे. त्यानंतर मग माणसांच्या बाजूने उभे राहायचे आहे," असे म्हणत सयाजी शिंदे यांनी जंगलाचा ऱ्हास करून असे प्रकल्प राबवू नका, अशी विनंती केली.

तसेच, "या सगळ्यांचे नुकसान करून, पर्यावरणाचा ऱ्हास करून असे प्रकल्प कशासाठी करायचे? मुळात आपण पाच टक्क्यांवर आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा सह्याद्री म्हणून आपण ज्या सह्याद्रीचा उल्लेख करतो, त्या सह्याद्रीला मुख्यमंत्र्यांना २५ प्रकल्प तयार करून वाळवंट बनवायचे आहे का? त्यांना सगळे संपवायचे आहे का?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री आणि आपण निवडून दिलेल्या नेत्यांनी पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे. त्यानंतर बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजेत. माझी सर्वांना विनंती आहे की, इथले प्राणी, पक्षी, जीव आणि झाडे यांची बाजू घ्या. शिवाय, आपण मोठमोठे वृक्ष तोडून त्या बदल्यात कुठेतरी छोटी झाडे लावतो, ही फसवणूक आहे. त्यामुळे कायद्यात बदल करा. निसर्गाची फसवणूक करू नका.

माझी मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांना विनंती आहे की, नियम बदला, कायद्यात बदल करा; पण झाडे तोडू नका. तुम्हाला जे प्रकल्प करायचे आहेत ते करा. महाराष्ट्रातील सर्व जनतेला माझी विनंती आहे की, सर्वांनी पेटून उठा. आपल्या डोळ्यांदेखत सह्याद्रीचे वाळवंट होता कामा नये," अशा शब्दांत सयाजी शिंदे यांनी वृक्षतोडीला कडाडून विरोध केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT