Karnataka News : कर्नाटक रक्षण वेदिके संघटना सातत्यानं महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या कुरापती काढत असते. काही दिवसांपूर्वीच या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकाला कन्नड येत नसल्याने त्याच्या तोंडाला व बसलाही काळं फासल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक वाद पेटला होता. आता याच कन्नडिगांच्या कर्नाटक रक्षण वेदिके संघटनेनं चक्क राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मनसेच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून पुन्हा एकदा मराठीसाठी आग्रही भूमिका मांडली होती. आपल्या भाषणात त्यांनी महाराष्ट्रातील बँकांमधील व्यवहार मराठीत होतात की नाही,याची तपासणी करा,बँकांना निवेदनं द्या असा आदेश दिला होता.
यानंतर मनसे (MNS) पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून बँकांमध्ये जाऊन मराठीचा आग्रह धरला जात आहेत. बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांना मारहाण देखील केली जात आहे. याचवेळी महाराष्ट्रातील राजकीय पक्षांकडून मनसेच्या भूमिकेवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असतानाच आता कन्नडिगांनी थेट मनसेला पाठिंबा जाहीर केल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कर्नाटकचे माजी मंत्री व कर्नाटक रक्षण वेदिके संघटनेचे नेते नारायण गौडा यांनी ट्विट करत मनसेच्या मराठीसाठीच्या आग्रही भूमिकेवर थेट भाष्य केलं आहे. कर्नाटक रक्षण वेदिकेने पहिल्यापासूनच भारतीय संघराज्यातील प्रत्येक भाषेला त्यांच्या संबंधित राज्यात प्रथम स्थान देण्यात यावे अशी भूमिका घेतली आहे.
नारायण गौडा यांनी यावेळी केंद्र सरकारवरही टीकेची तोफ डागली.ते म्हणाले, बँका आणि दुकानांमध्ये राज्याची भाषा न बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याचे मूळ कारण म्हणजे भारत सरकारचे नियम आहे. बँकेची भरती परीक्षा, जी फक्त संबंधित राज्यातील तरुणांसाठी खुली असायला हवी होती असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
कर्नाटक रक्षण वेदिकेनं आता संबंधित राज्यांमध्ये त्यांच्या भाषांचं जतन आणि विकास करण्यासाठी लढणाऱ्या भाषा संघटनांच्या संघर्षाचे समर्थन जाहीर केलं आहे.यावेळी गौडा म्हणाले,मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यशाची शुभेच्छा देतो.मनसे महाराष्ट्रातील बँका आणि दुकाने मराठीत व्यवहार करण्याची मागणी करत आहे.तर आम्ही कर्नाटकातील बँका आणि दुकाने कन्नड भाषेचा वापर सक्तीने करण्यासाठी संघर्ष करत आहोत, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्रात बँक एम्प्लॉईज असोसिएशननं राज ठाकरे आणि मनसेच्या भूमिकेवर तीव्र नाराजी दर्शवली आहे.यावेळी असोसिएशननं थेट राज ठाकरेंनाच टार्गेट केलं आहे.राज ठाकरेंना राजकीय स्टंट करायचा होता, त्यांनी बँकांना राजकीय मैदान बनवू नये, असे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे ज्वाईंट सेक्रेटरी देविदास तुळजापूरकर यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.