Kirit Somaiya, Uddhav Thackeray, Kishori Pednekar News Sarkarnama
मुंबई

Kirit Somaiya News : सोमय्यांचा पहिला ‘व्हिडिओ’ व्हायरल; ठाकरेंचे तिघेजण जेलमध्ये जाणार ?

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Kirit Somaiya News : ठाकरेंची शिवसेना, कॉंग्रेसचे जुने-मातब्बर नेते, राष्ट्रवादीच्या 'बड्या' नेत्यांवर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांचे आरोप करणारे भाजपचे नेते किरीट सोमय्यांचा आक्षेपार्ह 'व्हिडिओ' उघड झाला; तेव्हापासून वादात सापडलेले, माध्यमांपुढे 'ब्र'ही न काढलेल्या सोमय्यांनी शनिवारी स्वत:च एक 'व्हिडिओ' व्हायरल केला आणि त्यात कोविड घोटाळ्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना डिवचले. पहिल्या आक्षेपार्ह 'व्हिडिओ'नंतर सोशल मीडियावर पसरलेल्या सोमय्यांच्या या व्हिडिओचीही चर्चा होत आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांविरोधात (Kishori Pednekar) गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमय्या पुन्हा बोलके झाले आहेत. या प्रकरणात सोमय्यांनीच पेडणेकरांवरचे आरोप लावून धरले होते. या व्हिडिओत आणखी तीन नेते जेलेमध्ये जाणार असल्याचे सूतोवाच सोमय्या यांनी केले.

विरोधी नेत्यांना 'टर्गे' करीत केंद्रीय तपासयंत्रणांकडे फेऱ्या मारणाऱ्या सोमय्यांची (Kirit Somaiya) साऱ्याच पक्षाच्या नेत्यांना धास्ती असते. ठाकरेंपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत सोमय्यांनी कोणाला सोडले नाही. त्यामुळे गेल्या काही काळात सोमय्या राजकीय वर्तुळात दबदबा राखून राहिले. ते अनेकदा विरोधकांच्या निशाण्यावरही आले. पण त्यांची परवा न करत सोमय्या विरोधकांचे घोटाळे उघड करीत, राज्यभर फिरत राहिले. त्यावरून अनेक नेत्यांच्या चौकशा झाल्या.

पण १५ दिवसांपूर्वी याच सोमय्यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आणि ते अडचणीत आले. विधीमंडळाच्या अधिवेशनपासून राज्यभरात त्या 'व्हिडिओ'ची चर्चा झाली. त्यावरून सोमय्यांवर विरोधक तुटून पडले. परिणामी, घोटाळे उघड करण्याची 'हिम्मत' दाखविणाऱ्या सोमय्या याच व्हिडिओमुळे चहूबाजुंनी घेरले गेले. त्या काळात माध्यमांपुढे जाऊन त्यांनी बोलणे टाळले. त्यामुळे सोमय्या कुठे आहेत, असे प्रश्‍नही विचारले गेले. कोविड घोटाळ्यात माजी महापौर किशारी पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर काही वेळातच सोमय्यांनी 'व्हिडिओ'तून ठाकरे आणि पेडणेकरांवर पुन्हा वार केला.

सोमय्या म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या कोव्हिड काळात बॉडी बॅगसाठी गुन्हा दाखल झाला. मृतदेह ठेवण्याची १५०० रुपयाची बॅग सहा हजार ७०० रुपयात घेतली, असा आरोप सोमय्या यांनी केला. मुंबईच्या माजी महापौर, अतिरिक्त आयुक्त आणि वेदांत इन्नोटेक प्रा. लि. कंपनी, विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आम्ही या संबंधीची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली होती. आणखी तीन घोटाळ्यांचा तपास सुरु आहे. त्यावरही कारवाई होणार आहे. आधी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे पाटणर सुजीत पाटकर जेलमध्ये गेले आता किशोरी पेडणेकर आणि आणखी तीन नेते जेलमध्ये जाणार असल्याचा दावा सोमय्या यांनी केला.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT