Kirit Somaiya, Uddhav Thackeray
Kirit Somaiya, Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

किरीट सोमय्या दिल्लीहून मुंबईत परतले अन् उद्धव ठाकरेंना पुन्हा कात्रीत पकडले!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे मागील काही दिवसांपासून सातत्याने शिवसेनेवरती (Shivsena) तोफ डागत आहेत. शिवसेना कार्याध्यक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यापासून ते नेते, पदाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. अशातच रात्री उशिरा दिल्ली दौरा संपवून ते मुंबईत परतले. या दौऱ्यात त्यांनी राणा दाम्पत्याची भेट घेतली होती. दरम्यान, मुंबईत परतताच सोमय्या यांनी पु्न्हा एकदा ठाकरे कुटुंबियांवर तोफ डागली.

उल्हासनगरमध्ये भाजपा आमदार कुमार आयलानी यांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, आदित्य ठाकरे यांची ७ कोटी रुपयांची चोरी पकडली गेली. यावर उद्धव ठाकरे यांनी काय केले? रश्मी उद्धव ठाकरे यांचा १९ बंगल्यांचा घोटाळा बाहेर आला, त्यावर त्यांनी काय केले? उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याची साडेसहा कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली, काय केले? या सर्व प्रश्नांची उत्तरं उद्धव ठाकरे यांनी द्यावीत, असे आव्हान त्यांनी ठाकरे यांना दिले आहे.

"प्रत्येक न्यायालयांकडून सातत्याने चपराक खावून CM ठाकरेंचे दोन्ही गाल सूजले"

काल दिल्लीत खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा यांची भेट घेतल्यानंतर बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, कनिष्ठ, वरिष्ठ, उच्च तर कधी सर्वोच्च अशा प्रत्येक न्यायालयांकडून सातत्याने चपराक खावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे दोन्ही गाल सूजले आहेत. दोनच गाल आहेत. त्यावर आणखी किती चपराक खाणार? अशी खोचक टीका त्यांनी केली.

सोमय्या म्हणाले, न्यायालयाने काल राजद्रोहाचे (Sedition) कलम तात्पुरत स्थगित केले. उद्धव ठाकरे सरकारने राणा दाम्पत्याविरोधात हेच कलम लावले असल्याने ठाकरे सरकारला यावरून सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा चपराक मारली आहे. यापूर्वी मुंबई सत्र न्यायालयानेही राणा दाम्पत्यावर लावलेले राजद्रोहाचे कलम योग्य नसल्याचे निरीक्षण नोंदवलं होते. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकार आणखी किती वेळा आणि किती न्यायालयांकडून चपराक खाणार, असा सवालही त्यांनी केला.

यावेळी सोमय्या यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्यावरही निशाणा साधला. संजय पांडे यांचा वापर उद्धव ठाकरे सरकार माफियाप्रमाणे करत आहेत. मात्र न्यायालयाने सरकारला त्यांची जागा दाखवली. आता ते माफिया पोलिस आयुक्त कुठे आहेत? संजय पांडे साहेब, हिंमत असेल आता सर्वोच्च न्यायालयाला जाब विचारा. आता न्यायालयाने राजद्रोहाचे कलम निरस्त केले. आता उद्धव ठाकरे सरकार काहीही करू शकत नाही, असेही सोमय्या म्हणाले.

माफियांना आम्ही ठिकाणावर आणणार. माफियागिरी ही परिस्थिती हाताच्या बाहेर जात आहे. खासदार आणि आमदारांना धमकी देतात. २० फुट खड्ड्यात गाढण्याची भाषा फक्त माफिया सरकार करू शकते. मी स्वतः लोकसभा अध्यक्षांना भेटून या सरकारच्या माफियागिरीबद्दल तक्रार करणार आहे. मी गृहसचिवांचीही भेट घेतली आहे. उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारचा अंत झाल्यानंतरच आम्ही स्वस्थ बसणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT