nana patole pradnya satav sarkarnama
मुंबई

Legislative Council Election : विधान परिषद निवडणुकीत 'खेला होबे'? सर्वात सुरक्षित मानली जाणारी काँग्रेसच डेंजर झोनमध्ये

Mahavikas Aghadi Vs Mahayuti : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यात महायुतीच्या 9 आणि महाविकास आघाडीच्या 3 उमेदवारांचा समावेश आहे.

सरकारनामा ब्यूरो

- विजय चोरमोरे

विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार करणार नाही, असा ठोसपणे दावा महायुती आणि महाविकास आघाडीकडून केला जात आहे. पण, घोडेबाजाशिवाय पर्याय नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

त्यात भाजप, शिवसेना ( शिंदे ), राष्ट्रवादी ( अजित पवार ), काँग्रेस, राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार ) आणि शिवसेना ( ठाकरे ) यांच्यातील कोणाच्या उमेदवाराला अधिक धोका आहे, याचे राजकीय अंदाज बांधले जात आहेत.

शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर ( Milind Narvekar ) की अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अधिक धोका, याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रज्ञा राजीव सातव सर्वाधिक सुरक्षित उमेदवार मानल्या जातात. पण, सातव यांनाच निवडणुकीत अधिक धोका असल्याचं बोललं जातं.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यात महायुतीच्या 9 आणि महाविकास आघाडीच्या ( Mahavikas Aghadi ) 3 उमेदवारांचा समावेश आहे. काही दिवसांनी विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पाच वर्षांच्या कार्यकाळात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. त्यात विधानसभेचे संख्याबळ 288 वरून 276 वर आले आहेत.

2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे 44 उमेदवार निवडून आले होते. पण, सदस्यांचे निधन, पक्षांतर, चार सदस्य लोकसभेवर निवडून जाणं आदींमुळे 44 आमदार असलेल्या काँग्रेसचे संख्याबळ 37 वर आलं आहे.

विधान परिषदेला एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 23 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे एक जागा लढविणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव सर्वाधिक सुरक्षित असल्याचं दिसून येतात. मात्र, हीच सुरक्षिततेची भावना काँग्रेसवाल्यानं नेहमीप्रमाणं गाफील ठेवून दगाफटका होऊ शकतो.

काँग्रेसकडे सध्या 37 आमदार आहेत. त्यात इगतपुरीचे हिरामण खोसकर, अमरावतीच्या सुलभा खोडके, वांद्रे पूर्वचे झिशा सिद्दीकी या तीन आमदारांचा वावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आहे. तसेच, भाजप खासदार अशोक चव्हाण यांचे समर्थक तीन ते चार आमदार आहेत. त्यांची मते महायुतीा मिळाली पाहिजे, अशी तंबी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून चव्हाणांना देण्यात आली आहे.

त्यामुळे काँग्रेसचं संख्याबळ सध्या 30 वर येते. यातील किती मते काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांच्यासाठी निश्चित केली जातात, आणि किती महाविकास आघाडीच्या अन्य उमेदवारांचा निश्चित केली जातात, हे पाहावं लागणार आहे.

मते फुटण्याची चिंता

या निवडणुकीत मतदान गुप्त पद्धतीने होणार आहे. त्यामुळे कारवाईचा थेट धोकाही संभवत नाही. दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीतही काँग्रेसची मतेच अधिक प्रमाणात फुटली होती. त्यामुळे प्रज्ञा सातव यांच्यासाठी निश्चित केली जाणारी मते फुटणार नाहीत, याची काळजी काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वाला घ्यावी लागणार आहे.

सर्वाधिक सुरक्षितच, सर्वांत असुरक्षित

प्रज्ञा सातव या थेट काँग्रेस हायकमांडच्या उमेदवार आहेत. त्यामुळे राज्यातील नेत्यांची थोडी हलगर्जीही मोठ्या संकटाला निमंत्रण देऊ शकते. शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एखाद्या उमेदवाराची विकेट काढून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांची ‘बार्गेनिंग पॉवर’ कमी करण्याचा प्रयत्न राहील. पण, भाजपकडून थेट काँग्रेसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न राहील. त्यामुळे सर्वाधिक सुरक्षित असलेल्या काँग्रेसच्या उमेदवारालाच सर्वाधिक धोका असल्याचे मानले जाते.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT