Vidhan Bhavan Mumbai
Vidhan Bhavan Mumbai  sarkarnama
मुंबई

मोठी बातमी : महापालिका, ZP निवडणुका सहा महिने लांबणीवर; आताची प्रभागरचना रद्द

रश्मी पुराणिक

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारसंघांची रचना तयार करण्याचे अधिकार आणि निवडणुकांचे वेळापत्रक ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारडे देणारे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत आज मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत नियोजित असलेल्या निवडणुका किमान सहा महिने पुढे जाणार आहेत. यासाठीचे विधेयक आज दोन्ही सभागृहांत कोणतीही चर्चा न करता मंजूर झाले. ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी हे विधेयक मांडते. सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचे (obc Reservation) राजकीय आरक्षण रद्द झाल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरच गोंधळ निर्माण झाला आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळत नाही तो पर्यंत निवडणुका नको, अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली होती. निवडणूक आयोग सध्या त्यांच्याकडे असलेल्या अधिकाऱामुळे निवडणूक जाहीर करू शकतो. त्यात बदल करून निवडणुकांच्या तारखा ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारला मिळावे यासाठी हे विधेयक मांडण्यात आले आहे.

ते म्हणाले की ओबीसी आरक्षणावरून असाच गोंधळ मध्य प्रदेशमध्ये देखील झाला होता. तेथे निवडणूक आयोगाचे अधिकार काढून राज्य सरकारकडे घेण्यात आले. तसेच काहीसे आपण करत आहोत. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांची आज सकाळी आज आम्ही बैठक घेतली. त्यात याला मंजुरी घेण्यात आली. प्रभागरचना आणि आरक्षण यांची माहिती आता शासन गोळा करेल आणि शासन ही माहिती गोळा करून निवडणूक आयोगाकडे दिली जाईल. मग ते निर्णय घेतील. प्रभाग रचनेवर स्थगिती आणली गेली आहे, अशी महत्वाची घोषणा त्यांनी केली.

या विधेयकावर बोलतना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, आज जे विधेयक मंजूर झाले त्यात संपूर्ण प्रभाग रचना ही रद्द झालेली आहे. आता नव्याने सरकार प्रभाग रचना तयार करेल. यामुळे राज्यातील निवडणुकाही पुढे जातील. तारीख ठरवण्याचे विधेयक मांडले गेले आहे. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांचे काही अधिकार हे सरकारकडे आलेले आहेत. सरकार आता निर्णय घेऊन ते निवणूक अधिकाऱ्यांकडे अंतिम आदेशासाठी पाठवेल.

यावेळी नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, निवडणूक आयोगाच्या हातात काही सूत्र होती. त्यानुसार राज्य सरकारच्या परवानगी शिवाय निवडणुकीच्या तारखा जाहीर होत होत्या. त्यामुळे आज मध्य प्रदेशच्या धर्तीवर विधेयक तयार केले आहे. हे विधेयक एक मताने पारीत झाले आहे आहे. विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही या विधेयकाचे स्वागत केले. दरेकर म्हणाले, ओबीसी समाजासाठी चांगले बिल आणल्याबद्दल मी राज्य सरकारचे अभिनंदन करतो. हे विधेयक एकमताने मंजूर करतो. हे विधेयक सर्वोच्च न्यायालयात टिकेल पाहिजे, यासाठी राज्य सरकारने प्रामाणीक प्रयत्न करावे, असेही दरेकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT