Deepak Kesarkar
Deepak Kesarkar sarkarnama
मुंबई

Maharashtra Assembly Live : कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करणार का ? ; शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले..

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Assembly Live : पुरेशी पटसंख्या नसल्यामुळे राज्यातील अनेक शाळा बंद पडत आहेत. या विषयावर आज हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Live) चर्चा करण्यात आली. यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राज्यातील मराठी शाळांचा आढावा घेतला.

दिपक केसरकर म्हणाले, "वीस पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. आम्ही याबाबत पाहणी केली आहे, पण खर्च जास्त होतो म्हणून आम्ही शाळा बंद करणार नाही. सगळ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येणार नाही. लहान वाड्या-वस्त्यांवरील शाळा सुरु राहतील याची सरकार काळजी घेत आहे,"

अमित देशमुख म्हणाले, "२० पटसंख्या कमी असली तरी शाळा बंद करणार नाही हे सरकारने स्पष्ट करावे. लातूरमध्ये अशा ७२ शाळा आहे.राज्यात असे दीड लाख विद्यार्थी त्यांचा हा प्रश्न आहे," यावर केसरकर म्हणाले, "शाळा बंद करा असे कुठलेही परिपत्रक सरकारने काढलेले नाही. आम्ही शिक्षण हक्क कायद्याचे पालन करीत आहोत. स्थानिक लोकप्रतिनिधी विश्वासात घेऊन आम्ही निर्णय घेऊ. मुलं इंग्रजी माध्यम शाळेत जात आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपल्या मातृभाषेत दर्जेदार शिक्षण देणार आहे,"

"अनेक प्रगत देशात इंग्रजीमध्ये शिक्षण नसते. ते मातृभाषेतून शिक्षण घेतात. आपल्यावर इंग्रजांचा पगडा आहे. त्यामुळे इंग्रजी शिक्षण प्राधान्य दिले जाते.पण आम्ही आता मातृभाषेतून शिक्षण देणार आहोत, लवकरच ५० टक्के शिक्षकभरती करण्यात येणार आहे," असे केसरकर म्हणाले.

काल अधिवेशनात कोरोनाबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी स्पष्टीकरण केलं. "राज्यात टास्क फोर्स (task force)स्थापन करण्याची घोषणा काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात केली. तर राज्यात ‘टेस्ट- ट्रॅक- ट्रीट- व्हॅक्सिनेशन’वर भर दिला जाईल," असे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी काल नागपूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

तानाजी सावंत म्हणाले, "कोरोनाचे निर्बंध अद्याप कोठेही लावण्यात येणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील आवश्यक ते निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा संपूर्ण आढावा घेतला आहे. आरोग्य यंत्रणेस अलर्ट मोडवर राहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात मोठ्याप्रमाणावर लसीकरण झाले आहे. नविन व्हेरिएंट हा तेवढा घातक नाही,"

कोरोनाच्या नविन व्हेरिएंटचा राज्यात अद्यापही एकही रूग्ण सापडलेला नाही. प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्हणून विमानतळावर तपासणी आणि तपासणीत काही आढळून आल्यास तात्काळ विलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सावंत यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT