Jayant Patil, Rahul Narvekar
Jayant Patil, Rahul Narvekar sarkarnama
मुंबई

Jayant Patil : जावयाची ‘सासऱ्या’ वर कारवाई ; 'लेकी' कडे तक्रार करणार..

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Assembly Live : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना गुरुवारी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समितीही स्थापन केली आहे. जयंत पाटलांच्या निलंबनानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन सुरु केले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत राहुल नार्वेकरांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांचा पराभव केला होता. तीन जुलै रोजी नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावर निवड झाली आहे. राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत.

नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांना त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला होता. तेव्हा जयंत पाटलांनी नार्वेकरांचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. नार्वेकरांच्या अभिनंदन ठरावावर जयंत पाटलांनी सविस्तर भाषण केलं. तेव्हा त्यांनी नार्वेकरांबाबत केलेल्या मिश्कील भाषणाची सध्या विधीमंडळ परिसरात सर्वपक्षीय नेते चर्चा करीत आहेत.

काय म्हणाले होते जयंत पाटील..

राहुल नार्वेकरांचे अभिनंदन करताना जयंत पाटलांनी ‘नार्वेकर हे राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत, त्यामुळे ते आमचेही जावई आहेत, त्यांनी विरोधकांनाही न्याय द्यावा, अन्यथा आम्ही लेकीकडे तक्रार करू अन‌् घरी गेल्यावर तुमचा समाचार घेण्याची व्यवस्था करू,” असा टोला जयंतरावांनी लगावला होता. तेव्हा सभागृहात हशा पिकला होता.

काल (गुरुवारी) जयंत पाटलांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर या भाषणाची आठवण अनेकांना झाली आहे.'जावई'नार्वेकरांनी 'सासरे' जयंत पाटलांवर कारवाई केली, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. जयंत पाटलांच्या मुलाचे नुकतेच लग्न झाले. त्यावेळी या विवाह सोहळ्यास राहुल नार्वेकरही उपस्थित होते.

'लेकी'कडे तक्रार करणार का ?

काल 'विरोधकांना बोलू दिले नाही,' असा आरोप करीत जयंत पाटलांनी नार्वेकरांना अपशब्द वापरला, असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे.'विरोधकांनाही न्याय द्यावा, अन्यथा आम्ही लेकीकडे तक्रार करू अन‌् घरी गेल्यावर तुमचा समाचार घेण्याची व्यवस्था करू,” असे म्हणणारे जयंत पाटील आता नार्वेकरांची तक्रार 'लेकी'कडे करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT