मुंबई : ''भाजपला सत्तेची मस्ती आहे, बाकी काही नाही,''अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (mp Supriya Sule) यांनी आज भाजपवर शरसंधान साधले. आज लखीमपूर खिरी हत्याकांड प्रकरणी निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने 'महाराष्ट्र बंद' चे आवाहन केले होते. त्यानुसार हुतात्मा चौकात राष्ट्रवादीच्यावतीने मोदी व योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सुळे माध्यमांशी बोलत होत्या.
खासदार सुप्रियाताई सुळे यांनी माध्यमांनी पहिल्यांदा तो व्हिडीओ बघावा त्यात माणुसकी दिसते आहे का? त्यात क्रुरता दिसतेय असे सांगतानाच पहिले आपण माणसं आहोत ना असा सवालही केला. ''सरकार कुणाचंही असो ही जी कृती झाली ती चिंताजनक आहे. त्यामुळे केंद्रसरकारने जनतेला व शेतकऱ्यांना न्याय द्यावा,'' अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
''भाजपकडून या बंदला विरोध म्हणजे शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचं अप्रत्यक्ष समर्थन आहे,'' अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. लखीमपूरमधील हत्याकांडाची तुलना केवळ जालियनवाला बाग हत्याकांडाशीच होऊ शकते. त्याचा महाराष्ट्रातील घराघरातून निषेध होईल असेही जयंत पाटील म्हणाले.
'महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि आमचे मित्रपक्ष यांच्यावतीने हा बंद आम्ही पुकारला आहे. भाजप आजपर्यंत देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत होती. दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. पण लखीमपूरसारखी घटना जाणीवपूर्वक केलेलं हत्याकांड आहे,'' असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला. ''सरकारचा या बंदशी सूतराम संबंध नाही. भाजपने केलेल्या या कृत्याचा निषेध म्हणून जनताच उत्स्फूर्तपणे सहभागी झाली आहे,'' असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
''महाराष्ट्रात बंद सुरू झालेला आहे, या महाराष्ट्र बंदकडे (maharashtra bandh) देशाचा समस्त शेतकरी फार मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. मात्र भाजपने या बंदला विरोध केला असून सामान्य जनजीवन विस्कळीत होत असेल तर रस्त्यावर उतरुन विरोध करु असं म्हटलं आहे. मात्र बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मूर्ख आहेत,'' असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (mp Sanjay Raut) यांनी लगावला आहे. राऊत माध्यमांशी बोलत होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.