Maharashtra Government Sarkarnama
मुंबई

Maharashtra cabinet decisions : शिक्षकेतर कर्मचारी, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्वपूर्ण निर्णय...

Non-teaching staff benefits, disabled students welfare : महाराष्ट्र कृत्रिम बुध्दिमत्ता धोरण २०२६ जाहीर करण्यात आले असून त्यानुसार राज्यात १० हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आणि दीड लाख रोजगार संधींची निर्मिती केली जाणार आहे.

Rajanand More

Maharashtra government news : राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत सात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध शिक्षणसंस्थांमध्ये भराव्या लागणाऱ्या शुल्कासह आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षकांसाठी प्रगती योजना लागू करण्याच्या निर्णयाचा समावेश आहे. तसेच एआय इनोव्हेशन सिटीजची स्थापना, कोकणात केंद्रीय विद्यालय, हरित ऊर्जेला प्राधान्य आदी निर्णयांवरही बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.  

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी योजना

आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारे चालविल्या जाणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १२ व १४ वर्षांच्या नियमित सेवेनंतरची दोन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू केली जाईल.

दिव्यांग विद्यार्थ्यांना बळ

उच्च माध्यमिक परिक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार असून मागील १२ वर्षांनंतर पहिल्यांदाच त्यात भरीव वाढ करण्यात आली आहे. आता दिव्यांग विद्यार्थ्यांना विद्यापीठ, परीक्षा बोर्ड, संस्थेला भरावे लागणारे शुल्क, प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क, नोंदणी शुल्क, ग्रंथालय, नियतकालिकांसाठी व वैद्यकीय तपासणीचे शुल्क देण्यात येणार आहे.

रत्नागिरीत केंद्रीय विद्यालय

कोकणातील होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणकी एक महत्वाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. केंद्र सरकारचे केंद्रीय विद्यालय संघटन नवीन केंद्रीय विद्यालय उभारणार असून त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील मौजे नाचणे येथील २.५ हेक्टर जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे.

एआय इनोव्हेशन सिटीजची स्थापना

महाराष्ट्र कृत्रिम बुध्दिमत्ता धोरण २०२६ जाहीर करण्यात आले असून त्यानुसार राज्यात १० हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आणि दीड लाख रोजगार संधींची निर्मिती केली जाणार आहे. राज्यभरात एआयच्या संधींचे संतुलन साधण्यासाठी सहा एआय उत्कृष्टता केंद्र स्थापन केली जातील. याशिवाय पाच एआय इनोव्हेशन सिटीजची स्थापना केली जाईल.

महापुरूषांच्या विचारांचा जागर

लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या प्रख्यात संस्थेत भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापनेचा महत्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला. कायमस्वरुपी अध्यासनाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने डॉक्टरेटसाठी शिष्यवृत्तीही दिली जाणार आहे.

हरित महाराष्ट्र आयोग

राज्यात हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीसाठी महत्वाकांक्षी वृक्षारोपण मोहीम राबविली जाईल. पायाबूत सुविधा उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी व सनियंत्रण यासाठी आयोग काम करेल.

हरित ऊर्जेचा वापर वाढविणार

राज्यातील हरित ऊर्जेचा वापर आणि पारेषण क्षणतेचे अधिक बळकटीकरण केले जाणार आहे. त्यासाठी मॅजेस्टिक - महाराष्ट्र अॅक्सलरेटिंग ग्रीन एनर्जी अँड स्टोरेज टेक्नॉलॉजीज इंटिग्रेशन इन कनेक्टेड ग्रीड योजना राबविण्यात येणार आहे. योजनेसाठी जागतिक बँकेकडून कर्ज मिळणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT