Praveen Darekar
Praveen Darekar  Sarkarnama
मुंबई

Maharashtra Cabinet : प्रवीण दरेकरांचा पत्ता कट होणार... हे आहे कारण

सरकारनामा ब्युरो

पुणे : राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला (maharashtra cabinet expansion) अखेर मुहूर्त सापडला आहे. उद्या (मंगळवारी) सकाळी अकरा वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली. त्यात 35-65 च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. (Pravin Darekar news update)

राजभवनावर नव्या मंत्र्यांना शपथ देण्याची तयारीही जोरात सुरू आहे. मंत्रीमंडळात कोणाला संधी मिळणार, या बाबत काही नावांची चर्चा आहेत.

या मंत्रीमंडळात जनतेतून निवडून आलेल्यांनाच मंत्रीमंडळात संधी मिळणार आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या एकाही आमदाराला मंत्रीपद दिले जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांचा पत्ता कट होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

बहुप्रतीक्षित शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात 15 ते 18 मंत्री शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यात आता कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राजकीय वातावरण तापले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारले असता, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, हेच उत्तर प्रत्येकवेळी देत होते. तर दुसरीकडे, नवे सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेल्यानंतरही मंत्रिमंडळात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशिवाय इतर कोणत्याही मंत्र्याचा शपथविधी न झाल्याने विरोधी पक्षांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.

मंत्रिमंडळ विस्तार करायाला कशाला घाबरता, असा थेट सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ‘दोघांचे जम्बो मंत्रिमंडळ’ असे म्हणून तर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘दोन लोकांचे अपंग मंत्रिमंडळ’ असे म्हणून हिणवले होते.

जम्बो मंत्रिमंडळ पद्धतीला आळा घालण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळाचा विस्तार 42 मंत्रिपदांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वगळता उर्वरित 40 पदांपैकी शिंदे गटाला 15 तर, भाजपाच्या वाट्याला 25 मंत्रीपदे येतील. यात राज्यमंत्र्यांचाही समावेश आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT