Maharashtra Cabinet Expansion : केंद्र सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेनंतर आता महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्येही मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये लवकरच फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सुमार कामगिरी करणारे तसेच वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संभाव्य विस्तारात भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होऊ शकतात. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही मंत्र्यांच्या कामगिरीचाही आढावा घेतला जात असून, अकार्यक्षम किंवा वादग्रस्त ठरलेल्या मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही महिन्यांत महायुती सरकारमधील काही मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे सरकारला अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले आहे. तसेच काही मंत्र्यांच्या कामगिरीबाबतही नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे आगामी विस्तारात अशा मंत्र्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यामध्ये भाजपच्या 2, राष्ट्रवादीच्या 1 आणि शिवसेनेच्या 2 मंत्र्यांना नारळ दिला जाऊ शकतो, तर 6 नव्या चेहऱ्यांची एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे.
तर महायुतीतील प्रत्येक पक्ष आपल्या कोट्यातील मंत्र्यांबाबत निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे संबंधित पक्षांचे वरिष्ठ नेते आपल्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल करण्यासह काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय घेऊ शकतात.
या संदर्भात साम टीव्हीने वृत्त दिले असून, त्यांच्या सूत्रांच्या माहितीनुसार महायुती सरकारची प्रतिमा मलिन होईल अशी वक्तव्ये करणारे किंवा अपेक्षित कामगिरी न करणाऱ्या काही मंत्र्यांवर गंडांतर येऊ शकते. मात्र, कोणत्या मंत्र्यांवर कारवाई होणार किंवा कोणाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाराष्ट्रातही मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे फडणवीस सरकारमध्ये नेमका कोणाचा पत्ता कट होणार, कोणाच्या खात्यात बदल होणार आणि कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.