uddhav thackeray milind narvekar eknath shinde sarkarnama
मुंबई

Milind Narvekar : ठाकरे शिंदेंना धक्का देणार! मिलिंद नार्वेकरांना निवडून आणण्यासाठी कसा असेल 'गेम प्लॅन'?

Akshay Sabale

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मंगळवारी एकूण 12 जणांनी अर्ज दाखल केलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वीय सचिव अर्थात 'राईट हँड'ला रिंगणात उतरवून निवडणूक रंजक बनवली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवार 5 जुलैपर्यंत आहे.

एकाही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास निवडणूक होणं निश्चित आहे. पण, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वच पक्षांकडून पडद्याआडून हालचाली सुरू आहेत.

मिलिंद नार्वेकर विधानपरिषदेच्या मैदानात उतरल्यानं निवडणुकीत चुरस वाढली आहे. 'शिवसेनेचा उमेदवार माघार घेणार नाही. उलट आमचा उमेदवार निवडून येईल,' असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) व्यक्त केला. त्यामुळे पराभूत होणार म्हणजेच '12 वा' उमेदवार कोण असेल, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

आमदारांचे राजीनामे किंवा निधनामुळे विधानसभेचे संख्याबळ 14 ने घटलं आहे. त्यामुळे विजयासाठी पहिल्या पसंतीच्या 23 मतांची आवश्यकता आहे. संख्याबळानुसार भाजपचे पाच, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रत्येक दोन, काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतात. पण, 11 व्या उमेदवाराचं भविष्य शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडील मतांच्या आधारे ठरणार आहे. ठाकरे गटानं मिलिंद नार्वेकर ( Milind Narvekar ) आणि शरद पवारांच्या पक्षानं शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना उमेदवारी दिल्यानं गणितं बदलली आहेत.

नार्वेकरांना काँग्रेसचा हात मिळणार की शिंदे गटाला धक्का देणार?

काँग्रेसकडे सध्या 37 आणि शिवसेना ठाकरे गटाकडे 15 आमदार आहेत. महाविकास आघाडीचं सरकार कोसळण्यापूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा काँग्रेसमधील अंतर्गत मतफुटीमुळे पराभव झाला होता. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं काही आमदार पक्षाबरोबर नसल्याचं गृहीत धरून खबरदारी घेत प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेकडे 15 मते असल्यानं नार्वेकरांना आठ मतांची गरज आहे. काँग्रेसकडील अतिरिक्त मते नार्वेकरांना मिळण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्याशिवाय काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दुसऱ्या पसंतीची मते नार्वेकरांना द्यावीत, असा 'गेम प्लॅन' आखला जात आहे. त्यासह शिंदे गटातील आमदारांशी नार्वेकर यांचे वैयक्तिक संबंध आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटातून नार्वेकरांना मदत झाली, तर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का असू शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT