devendra fadnavis eknath shinde ajit pawar nana patole uddhav thackeray sharad pawar sarkarnama
मुंबई

Legislative Council Election : महायुती की मविआ कोण ठरणार 'किंग'; दादा अन् शिंदेंचे आमदार फुटणार?

Akshay Sabale

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं गुणगान सुरू असतानाचा विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम मंगळवारी जाहीर झाला. यासाठी 12 जुलै रोजी विधानसभेच्या सदस्य मतदान करतील. त्यामुळे महाविकास आघाडी की महायुती, कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

2 जुलै रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख आहे. तर, 5 जुलै रोजी निवडणुकीतून माघार घेण्याची मुदत आहे. एका आमदाराच्या विजयासाठी 23 मतांचा कोटा ठरविण्यात आला आहे.

या कोट्यानुसार महायुतीचे 8 तर महाविकास आघाडीचे 3 आमदार निवडून येण्याची शक्यता आहे. मात्र, लोकसभेला महाविकास आघाडीनं महायुतीला धक्का दिला आहे. त्यामुळे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदारांच्या भूमिकेत 'चमत्कार' घडला तर महायुतीचं 'टेन्शन'मध्ये वाढ होऊन संख्याबळ कमी होऊ शकते.

लोकसभेवर निवडून गेल्यानं आमदारांचा राजीनामा, आमदारांचे निधन आणि अपात्रतेची कारवाईमुळे विद्यमान विधानसभेतील आमदारांचे संख्याबळ 288 वरून 274 वर आले आहे. गेल्या दोन वर्षांत शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली आहे. त्यात भाजपला फायदा होणार आहे.

भाजपकडे 103 आमदार आहेत. त्यात भाजपला छोट्या आणि अपक्ष 10 आमदारांचा पाठिंबा आहे. त्याचे 5 आमदार निवडून येऊ शकतात. शिंदे गटाकडे 37 आमदार आहेत. त्यांना 10 आमदारांचा पाठिंबा असल्यानं त्यांचेही दोन आमदार निवडून येऊ शकतील. अजित पवारांकडे 39 आमदार असून अतिरिक्त मतांच्या अधारे त्यांचेही दोन आमदार निवडून येऊ शकता.

महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वाधिक 37 आमदार आहेत. तर, ठाकरेंकडे 15 आणि शरद पवारसाहेबांकडे 13 आमदार आहेत. त्याआधारे महाविकास आघाडीचे 3 आमदार निवडून येण्याची शक्यता आहे.

क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता

काहीच दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीत कल हाती आला. '45 पार'चा नारा देणाऱ्या महायुतीला 20 जागाही जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीत चलबिचल सुरू आहे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना सोडून गेलेले आमदार संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. या निवडणुकीत गुप्त मतदानानं प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कुंपणार बसलेले आमदार विरोधात ( क्रॉस व्होटिंग ) मतदान करू शकतात.

खासदार झाल्यानं राजीनामा दिलेले आमदार -

काँग्रेस : वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर, बळवंत वानखेडे

राष्ट्रवादी : नीलेश लंके

शिवसेना ( शिंदे गट ) : संदीपान भुमरे, रवींद्र वायकर

निधन झालेले आमदार -

भाजप : गोवर्धन शर्मा, राजेंद्र पाटणी

शिंदेसेना : अनिल बाबर

काँग्रेस : पी. एन. पाटील

राष्ट्रवादी : भारत भालके

हे आमदार निवृत्त होणार -

भाजप : विजय गिरकर, रमेश पाटील, रामराव पाटील, निलय नाईक

शिवसेना ( शिंदे गट ) : मनीषा कायंदे

समाजवादी पक्ष : अब्दुल्ला खान दुर्राणी

शिवसेना ( ठाकरे गट ) : अनिल परब

काँग्रेस : वजाहत मिर्झा, प्रज्ञा सातव

रासप : महादेव जानकर

शेकाप : जयंत पाटील

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT