Mahavikas Aghadi Sarkarnama
मुंबई

MLC Election : सपकाळ, सुप्रिया सुळेंनी भूमिका मांडूनही ठाकरेंनी ऐकलं नाही; आता भाजप निवडणुकीचा निकाल फिरवणार?

Maharashtra MLC election, Uddhav Thackeray news : राज्यसभेची परतफेड म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून दानवे यांना पाठिंबा जाहीर केला जाईल. दोन्ही पक्षांकडे दानवे यांना विजयी करण्याइतपत काठावर आमदार आहेत.

Rajanand More

MVA rift Maharashtra : राज्यात विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी गुरूवारपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. भाजपने मंगळवारी सहा उमेदवारांची नावे जाहीर करत आघाडी घेतली आहे. तर आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. दानवे यांच्या नावामुळे आता काँग्रेसही उमेदवार देणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यातच भाजपकडूनही महाविकास आघाडीतील या फुटीचा फायदा घेतला जाऊ शकतो.

विधानसभेतील संख्याबळ पाहता दहापैकी सहा जागांवर भाजप, दोन जागांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना, एक जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस तर एका जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार सहजपणे विजयी होऊ शकतो. मात्र, मागील काही राज्यसभा आणि विधानपरिषदांच्या निवडणुकांचा इतिहास पाहता आघाडीला आपली मते एकसंध ठेवण्यात अपयश आले आहे.

आघाडीतील काही आमदारांना हेरत भाजपने त्यांचे मतदान आपल्याबाजूने वळवत आघाडीला झटके दिले आहेत. येत्या निवडणुकीतही आघाडीला ही भीती आहे. त्यामुळे या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनीच उमेदवार असावे, असे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी दिले होते. ठाकरे उमेदवार असल्यास महायुती अतिरिक्त उमेदवार देणार नाही, अशीही चर्चा होती.

आता मात्र ठाकरेंनी अंबादास दानवे यांनाच पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर लगेचच काँग्रेसकडूनही उमेदवार दिला जाण्याचे संकेत मिळू लागले आहे. काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी मीडियाशी बोलताना काँग्रेस कदाचित उमेदवार देईल, असे विधान करत आघाडीत मतभेद चव्हाट्यावर आणले आहेत.

महाविकास आघाडीतील या फाटाफुटीचा फायदा भाजप उचलू शकते. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे आपले उमेदवार निवडून आल्यानंतर काही मते अतिरिक्त राहतात. ही मते आणि आघाडीतून काही मतांची जुळवाजुळव करत महायुतीचा दहावा उमेदवारही निवडून आणण्याची तयारी केली जाऊ शकते. यापूर्वीच्या काही निवडणुकांमध्ये भाजपने ते शक्य करून दाखविले आहे.

राज्यसभेची परतफेड म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून दानवे यांना पाठिंबा जाहीर केला जाईल. दोन्ही पक्षांकडे दानवे यांना विजयी करण्याइतपत काठावर आमदार आहेत. त्यातही घोडाबाजार होऊन काही आमदार गैरहजर राहिले किंवा क्रॉस वोटिंग केले तर दानवेंना धक्काही बसू शकतो. त्यामुळे दानवेंना काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्यास त्यांचा मार्ग सुकर होईल.

काँग्रेसने उमेदवार दिल्यास हा ठाकरेंसाठी मोठा धक्का ठरू शकतो. काँग्रेसपाठोपाठ महायुतीही उमेदवार देऊ शकते. आघाडीत मतांची फूट होऊन त्याचा फायदा युतीला होईल. काँग्रेसने उमेदवार न देता दानवे यांना पाठिंबा दिला आणि त्यानंतरही युतीने उमेदवार दिल्यास आघाडीसाठी ही निवडणूक आव्हानात्मक ठरू शकते. त्यामुळे दानवेंना विधानपरिषदेत पाठविण्यासाठी उद्धव ठाकरे यांना काँग्रेससह भाजपचेही मन वळवून बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न करावे लागतील.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT