Shinde-Fadnavis Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics Live : शिंदे मध्यभागी, बाजूला फडणवीस आणि मुख्य सचिव : पहिली कॅबिनेट संपली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली पहिली कॅबिनेट आज झाली.

सरकारनामा ब्युरो

शिंदे सरकारची पहिली कॅबिनेट बैठक आज संपली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचे मंत्रालयात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी स्वागत केले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर सचिव आणि वरिष्ठाधिकारी यांच्याशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले," आपण नवीन सुरुवात करत आहोत. आपल्यासोबत अनुभवी उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यामुळे कारभार करण्यास अडचण येणार नाही राज्यातील विकास कामे विविध प्रकल्प आणि समाज घटकाला न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम करावे लागते ही एका रथाची दोन चाके आहेत लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो सार्थ ठरवायाचा आहे. आपल्या कामातून गती किमान शासन प्रशासन आहे. असा संदेश जाणे मेट्रो समृद्धी महामार्ग जलसंपदा विभागांचे महत्त्वाचे प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावयाचे आहेत त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य मिळेलच, हा विश्वास आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, "आपल्या सोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे. गतिशीलता देणे आणि निर्णय क्षमता येणे महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न करूया"  मोठा पक्ष असूनही भाजपने आणि देवेंद्र फडणवीस यांनी मोठे मन दाखवले आणि मला मुख्यमंत्रीपदी बसविले, अशा शब्दांत शिंदे यांनी आभार मानले. माझ्यासोबत असलेल्या 50 आमदारांना फोडायचे बरेच प्रयत्न केले. पण कोणीही फोडला नाही. माझ्याकडचे 50 आणि भाजपचे 150 अशा 170 आमदारांचा भक्कम पाठिंबा आहे. आणखी किती आमदार येतील, हे सांगता येत नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी मंत्रीमंडळ वार्ताहर संघाच्या सत्कार प्रसंगी बोलताना दिली. 

शपथविधीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांची नाराजी चेहऱ्यावरून लपत नव्हती, असे अनेकांचे मत झाले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि फडणवीस हे सरकारबाहेर राहणार, अशी घोषणा दुपारी झाली तेव्हाच तेथे असलेल्या भाजप नेत्यांना धक्का बसला होता. राजभवनावर गेलेल्या अनेक भाजप नेत्यांसाठी  ते अनाकलनीय होते. या नेत्यांचेही चेहरे पडले होते. त्यानंतर फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदासाठी केंद्रीय नेत्यांनी दबाव आणल्याचे सांगण्यात आले. एकदा मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर पुन्हा त्यापेक्षा कनिष्ठ पदावर येण्यास ते इच्छुक नव्हते. पण पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सूचना केल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्टपणे दिसून आली. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंदे आणि फडणवीस यांचे अभिनंदन केले. फडणवीस हे सरकारमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले. फडणवीस हे भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आदर्श असल्याचे कौतुगादगार मोदी यांनी काढले. 

राज्याचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी आठ वाजता राजभवन येथे शपथ घेतली. त्यांच्यासोबत भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या दोघांना शपथ दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे गुरू धर्मवीर आनंद दिघे यांचा उल्लेख करून त्यांनी पुढे शपथ पूर्ण केली. 

एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद LIVE

आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामे आणि राज्याचा विकास हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत. शिवसेना पक्ष म्हणून आणि इतर पक्ष असे 50 आमदार एकत्र आहोत. वैचारिक भूमिका, राज्याचा विकास आणि अडीच वर्षापुर्वी जे घडलं आहे. गेल्या काही काळात आम्ही मुख्यमंत्री महोदयांना मतदारसंघातील समस्या, विकासप्रकल्प, अडचणी याबाबत वारंवार माहिती दिली.

मीदेखील अनेकदा चर्चा केली. आमची नैसर्गिक युती होती, त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. त्याबाबत आमदारांमध्ये नाराजी होती आणि मतदारसंघातील प्रश्न किंबहुना पुढच्या निवडणुकीत लढणे किंवा जिंकणे याबाबतच्या अडचणी लक्षात घेऊन आम्ही भूमिका मांडली. पण आम्ही कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता ही भूमिका घेतली.

आघाडीत काही निर्णय घेता येत नव्हते

आतापर्यंत विरोधाकडून सत्तेकडे जात असतात. पण आता सत्तेतून विरोधकांकडे गेलो आहोत. मीही मंत्री होतो. पण राज्याच्या भविष्याच्यादृष्टीने जे घडत होते, ते योग्य नव्हते. काही निर्णय आघाडीत घेता येत नव्हते. आम्ही हिंदुत्वाची भूमिका घेऊन गेल्यानंतर काही निर्णय झाले. पण हे पुर्वीच व्हायला हवे होते.

हे घडत असताना 50 आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात याचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात हे 50 लोक एकत्र येतात. या आमदारांच्या मतदारसंघातील प्रश्न मला सांगितल्यानंतर हा निर्णय मला घ्यावा लागला. राज्याच्या विकासासाठी, जनतेच्या मनातील अपेक्षांसाठी घेतला.

ही ऐतिहासिक घटना, फडणवीसांनी उदारता दाखवली

आज फडणवीसांकडे 120 चे संख्याबळ आहे. असं असतानाही मुख्यमंत्रिपद तेही घेऊ शकले असते. परंतु त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला. याबद्दल मी त्यांचा मनापासून पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, फडणवीसांचे आभार मानतो. ही ऐतिहासिक घटना आहे. जे काही घडलं ते वास्तव आपल्यासमोर आहे.

राज्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही दिवसरात्र एक करू. फडणवीस आमच्या पाठिशी आहेत. एवढ्या मोठ्या मनाचा माणूस पाहायला मिळत नाही. आजकालच्या राजकारणात काय होईल, हे आपण पाहत असतो. पण काही मिळत असताना त्यांनी जी उदारता दाखवली आहे ती दुर्मिळ आहे. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो.

यापूर्वी आलेल्या अनुभवांची पुनरावृत्ती होऊ देणार नाही

एकीकडे मोठे नेते आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेसारख्या छोट्या कार्यकर्त्यासोबत येऊन ते माझ्यासोबत आले. माझ्यासोबतच्या 50 आमदारांनी अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. त्यांना यापूर्वी आलेल्या अनुभवाची पुनरावृत्ती होऊ देणार नाही. आता आमची ताकद वाढली आहे. आणखी किती येतील, हे माहित नाही. पण सर्वांचे पाठबळ मला मिळेल. ज्या राज्यात केंद्र सरकारची ताकद उभी राहते, तिथे विकासात अडचण येणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

एकनाथ शिंदे होणार मुख्यमंत्री

- देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, अशी मोठी घोषणा केली आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार येईल, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. या सरकारमध्ये शिंदे गट आणि भाजपचे मंत्री सहभागी असतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. हे सरकार पडलं त्यावेळी महाराष्ट्राला एक पर्यायी सरकार देणं आवश्यक होतं.

- मी त्याचवेळी सांगितलं होतं हे सरकार चालणार नाही. आम्ही निवडणुका लादणार नाही, हे सांगितलं होतं. म्हणून शिवसेनेचा विधीमंडळ गट, भाजपचा गट आणि 16 अपक्ष आणि छोट्या पक्षांचा गट सोबत आले आहेत. या सगळयांचे पत्र राज्यपालांना दिले आहे. भाजपने हा निर्णय केला की, आम्ही सत्तेच्या पाठीमागे नाही. ही तत्वांची लढाई, हिंदुत्वाची, विचारांची लढाई आहे, असं फडणवीस म्हणाले.

शिंदे यांच्या नेतृत्वात मेट्रो, मराठी आरक्षण, ओबीसी आरक्षणासह सर्व प्रश्न सोडवले जातील. प्रत्येक टप्प्यावर दुर्बल घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न हे सरकार करेल. त्यामुळे शिंदे यांचे मी अभिनंदन करतो, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला आहे. आमचे 106 आणि इतर अपक्षांच्या समर्थनाचे पत्र आम्ही राज्यपालांकडे सोपवले आहे. राज्यपालांनी सायंकाळी साडेसात वाजता शपथविधीसाठी आमंत्रित केले आहे. आज केवळ त्यांचीच शपथ होईल. त्यानंतर मंत्रिमंडलाचा विस्तार केला जाईल, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मी सरकारबाहेर राहून या सरकारला मदत करणार असल्याचेही फडणवीस यांनी जाहीर केले.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद LIVE

2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना 56 जागा आणि आम्ही 106 जागा अशा जवळजवळ 170 लोकं निवडून आली होती. साहजिकच ही अपेक्षा होती की भाजप आणि शिवसेनेचं सरकार होईल. त्यावेळी पंतप्रधानांनी सर्वांच्या उपस्थित भाजपचे मुख्यमंत्री बनेल अशी घोषणाही केली. पण दुर्देवाने त्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर तेव्हाचे आमचे मित्र शिवसेना आणि नेते यांनी वेगळा निर्णय घेतला. आणि विशेषत बाळासाहेब ठाकरे यांनी आजन्म ज्यांचा विरोध केला आणि ज्यांनी हिंदुत्वाच्या विचाराचा विरोध केला अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसोबत युती केली. भाजपला बाहेर ठेवलं. हा जनतेनं युतीला मतं दिली होती. पण त्याचा अपमान त्यावेळी झाला, असं फडणवीस यांनी सांगितलं.

मागील अडीच वर्षात प्रचंड भ्रष्टाचार पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या इतिहासात दोन मंत्री हे भ्रष्टाचारासाठी जेलमध्ये जाणं हे अत्यंत आश्चर्याची गोष्ट होती. खेदजनक बाब होती. एकीकडे माननीय बाळासाहेब ठाकरेंनी देशाचा शत्रु असलेल्या दाउदशी संबंधित मंत्र्याला मंत्रिपदावरूनही काढण्यात आला नाही. रोज सावरकर, हिंदुत्वाचा अपमान केला जात होता. शेवटच्या दिवशी संभाजीनगर झालं. पण गव्हर्नरचं पत्र आल्यानंतर कुठलीही कॅबिनेट घ्यायची नसते हा नियम आहे. पण तरीही बैठक घेतली. जाताजाता हे निर्णय घेतले. अर्थात येणाऱ्या सरकारला हे परत निर्णय घ्यावे लागतली.

या काळात शिवसेनेच्या आमदारांची मोठी कुचंबणा झाली. उद्या आम्ही कशाच्या भरवसावर लढायचं. आमच्याच मतदारसंघात आमचे हरलेले विरोधकांना निधी दिला जात असेल तर कशाच्या भरवशावर लढायचं, असा मुद्दा पुढे आल्यानंतर त्यांनी काॅग्रेस-राष्ट्रवादीसी युती तोडण्याचा निर्णय घेतला. पण उद्धवजींनी या आमदारांऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना जास्त प्राधान्य दिलं आणि शेवटपर्यंत त्यांचीच कास धरली.

हे सरकार पडलं त्यावेळी महाराष्ट्राला एक पर्यायी सरकार देणं आवश्यक होतं. मी त्याचवेळी सांगितलं होतं हे सरकार चालणार नाही. आम्ही निवडणुका लादणार नाही, हे सांगतलं होतं. म्हणून शिवसेनेचा विधीमंडळ गट, भाजपचा गट आणि 16 अपक्ष आणि छोट्या पक्षांचा गट सोबत आले आहेत. या सगळयांचे पत्र राज्यपालांना दिले आहे. भाजपने हा निर्णय केला की, आम्ही सत्तेच्या पाठीमागे नाही. ही तत्वांची लढाई, हिंदुत्वाची, विचारांची लढाई आहे.

फडणवीस-शिंदेंनी घेतली राज्यपालांची भेट

देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी फडणवीस आणि शिंदे यांना पेढा भरवून स्वागत केलं. शपथविधी आधीच राज्यपालांनी पेढा भरवतानाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यावरून चर्चांना उधाण आलं आहे. भाजपकडून सत्तास्थापनेचा दावा राज्यपालांकडे करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, आशिष शेलार, प्रविण दरेकर, राधाकृष्ण विखे पाटील हे नेते उपस्थित आहेत.

फडणवीस-शिंदे राजभवनमध्ये दाखल

देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे काही वेळापुर्वीच राजभवनात दाखल झाले आहे. दोन्ही नेते सागर बंगल्यातून एकाच गाडीतून निघाले होते. त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील व भाजपचे इतर नेतेही आहेत. राज्यपालांने भेटून ते सत्तास्थापनेचा दावा करतील.

भाजपचे बडे नेते सागर बंगल्यात

देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अन्य काही नेते सागर बंगल्यात उपस्थित आहेत. त्यानंतर फडणवीस व शिंदे हे एकाच गाडीत राजभवनाकडे रवाना झाले आहेत.

राजभवन सजू लागलं

आज सायंकाळी सात वाजता शपथविधी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासनाकडून राजभवनावर जय्यत तयारी सुरू करण्यात आल्याचे दिसते. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. त्यानंतर दोघे नेते संयुक्तपणे पत्रकार परिषद घेणार असल्याचे समजते.

शिंदे व फडणवीस खलबतं सुरू

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गोव्यातून मुंबईत दाखल झाले आहेत. सध्या ते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यात दाखल झाले आहेत. दोघांमध्ये मंत्रिपदावरून खलबतं सुरू असल्याचे समजते. भाजपचे इतर बडे नेते याठिकाणी उपस्थित आहेत. या चर्चेनंतर शिंदे व फडणवीस हे दोघे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनात जाण्याची शक्यता आहे. राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर दोघांचाही शपथविधी आजच रात्री होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT