Shalarth ID approval work in Mumbai divisionRecruitment  Sarkarnama
मुंबई

Shalarth Portal: शालार्थ आयडीच्या प्रलंबित प्रकरणांना मिळणार गती; शिक्षण विभागाचा मोठा प्रशासकीय बदल, मंजुरी आता कोणाकडे?

Shalarth ID approval work in Mumbai division: मुंबई विभागातील शालार्थ आयडी मान्यतेची जबाबदारी आता देविदास कुलाल यांच्याकडे. शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण प्रशासकीय निर्णय.

Mangesh Mahale

Mumbal News: राज्यातील शैक्षणिक प्रशासनात एक महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या नव्या आदेशानुसार, मुंबई विभागातील उच्च माध्यमिक विद्यालयांमधील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 'शालार्थ आयडी' (Shalarth ID) मान्यतेसंबंधीचे सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक कामकाज आता राज्य प्रकल्प समन्वयक देविदास कुलाल यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत ते हे पद सांभाळत असून, या नव्या जबाबदारीमुळे प्रलंबित असलेल्या शालार्थ आयडीच्या प्रकरणांना गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयामुळे मुंबई विभागातील शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न जलद गतीने मार्गी लागण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

याच निर्णयामध्ये अन्य एका महत्त्वाच्या पदाचा अतिरक्त कार्यभार देखील पुनर्रचित करण्यात आला आहे. यापूर्वीच्या आदेशानुसार, महाराष्ट्र राज्य, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभागीय मंडळ, मुंबईचे विभागीय अध्यक्ष पदाचा अतिरक्त कार्यभार सुभाष बोरसे (विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळ, नाशिक) यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

नव्या आदेशानुसार, शालार्थ आयडी मान्यता देण्याच्या कामाचा अधिकार वगळता, मुंबई विभागीय मंडळाच्या विभागीय अध्यक्षांचा इतर सर्व अतिरिक्त कार्यभार पूर्वीप्रमाणेच सुभाष बोरसे यांच्याकडेच कायम ठेवण्यात आला आहे.

प्रशासकीय पारदर्शकता, गतीशीलता वाढवण्याचे उद्दिष्ट

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'शालार्थ प्रणाली'तील आयडी मंजुरीची प्रक्रिया अधिक सुटसुटीत आणि पारदर्शक करण्यासाठी शासनाकडून सतत पावले उचलली जात आहेत.

मुंबई विभागातील शिक्षण क्षेत्रातील विविध प्रस्तावांची संख्या लक्षात घेता, हा कार्यभार एका विशिष्ट यंत्रणेकडे आणि सक्षम अधिकार्याकडे सुपूर्द केल्यामुळे शिक्षक वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः नव्याने नियुक्त किंवा सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांच्या शालार्थ आयडी मंजुरीसाठी याआधी अनेकदा विलंब होत असल्याच्या तक्रारी होत्या, ज्यावर या बदलामुळे सकारात्मक परिणाम होईल अशी अपेक्षा आहे.

हा संपूर्ण प्रशासकीय बदल महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाद्वारे मंत्रालयीन स्तरावरून मंजूर करण्यात आला आहे. राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हा आदेश जारी करण्यात आला आहे. मंत्रालयाने या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ प्रभावाने करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT