Vidhan Bhavan Mumbai, Maharashtra Political Crisis  Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics : आमदारांच्या संख्येत वाढ होण्याने सगळीचे गणिते बदलणार, फडणवीसांचे सूचक संकेत

Maharashtra Assembly Seats Delimitation in 2026 : लवकरच मतदार संघ पुनर्रचना कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे.

Mangesh Mahale

Mumbai Political News : आमदार होण्याची इच्छा असणाऱ्यासाठी गुड न्यूज आहे. राज्यात लवकरच मतदार संघ पुनर्रचना करण्यात येणार आहे. त्यामुळे विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदारांच्या सख्येत वाढ होणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिले आहेत.

पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर अशा महानगरातील लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे अशा पाच लाख किंवा त्याहून अधिक मतदारसंख्या असलेले विधानसभा मतदारसंघ विभागून नवे मतदार संघ तयार होणार आहेत. त्यामुळे सर्व पक्षातील इच्छुकांच्या आमदार होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत कारण लवकरच मतदार संघ पुनर्रचना कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नवे विधिमंडळ उभारणार

२०२५ नंतर या प्रक्रियेला गती येणार आहे. पण २०२४ मध्ये होणारी विधानसभा ही जुन्या रचनेप्रमाणेच होणार आहे, तर नव्या रचनेत आमदार, खासदारांची संख्या वाढणार आहे. मतदार संघाची रचना बदल्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. आमदारांची संख्या वाढणार असल्यामुळे नवे विधिमंडळ उभारण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

सध्या विधिमंडळात विधानसभेत २८८ तर विधान परिषदेत ७८ आमदार आहेत. नव्या रचनेत विधानसभेतील सदस्य संख्या ३६० तर विधान परिषदेतील संख्या १०० वर जाऊ शकते, असे संकेत फडणवीस यांनी दिल्याने आमदार होऊ इच्छिणाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मुंबई येथील एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.

असा होतो मतदारसंघांच्या रचनेत फेरबदल

  • लोकसंख्येत वाढ झाल्यामुळे काळानुसार लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघांच्या रचनेत फेरबदल केले जातात. यालाच मतदारसंघांची पुनर्रचना म्हटले जाते.

  • वेगवेगळ्या भागात लोकसंख्येचे प्रमाण कमी-अधिक असते. लोकसंख्येच्या आधारावर समान प्रतिनिधीत्व मिळावे म्हणून मतदारसंघांची पुनर्रचना केली जाते.

  • मतदारसंघांच्या पुनर्रचनेची प्रक्रिया स्वायत्त असलेल्या पुनर्रचना आयोगामार्फत राबवली जाते. आयोगाची स्थापना केंद्र सरकारकडून पुनर्रचना आयोग कायद्याच्या आधारे केली जाते.

  • हा आयोग निवडणूक आयोगाच्या सहकार्याने काम करतो. या आयोगात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती, मुख्य निवडणूक आयुक्त तसेच संबंधित राज्यांचे मुख्य निवडणूक आयुक्त असतात.

  • पुनर्रचना आयोग कोणत्याही बाह्य हस्तक्षेप किंवा बाह्य प्रभावाशिवाय काम करत असतो. आयोगाने केलेली पुनर्रचना अंतिम असते.

  • सध्या असलेल्या मतदार संघाची रचना ही १९७१च्या लोकसंख्येच्या आधारे करण्यात आली आहे. आता नवीन लोकसंख्येच्या आधारे २०२६ला नवीन मतदार संघाची रचना होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT