मुंबई : मुंबै जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी भाजपला चकवा देण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस यशस्वी झाले आहेत. या बॅंकेचे अध्यक्षपद भाजपकडे राहील, अशा रीतीने मावळते अध्यक्ष प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि भाजपचे नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी सर्पवक्षीय पॅनेलची रणनीती आखली होती. मात्र अखेरीस महाविकास आघाडीकडेच अध्यक्षपद घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी भाजपचे प्रसाद लाड यांचा पराभव केला. भाजपचे विष्णू भोंगळे यांनी ऐनवेळी भाजपची साथ सोडत महाविकास आघाडीला अध्यक्षपदासाठी मतदान दिले. त्यामुळे भाजपला पराभवाचा धक्का बसला. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत समसमान मते पडली.
दरेकर यांच्याकडे गेली अनेक वर्षे बॅंकेची सूत्रे होती. मात्र त्यांच्या मजूर म्हणून बॅंकेवर निवडून येण्याचा फंडा यंदा वादात पडला. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या मतदारसंघातूनही संचालक म्हणून निवडून आले. संचालकांत शिवसेना +राष्ट्रवादी काँग्रेस, असे एकूण ११ संचालक होते. भाजपकडे ९ संचालक होते. त्यामुळे महाविकास आघाडीकडे ताकद होती. निवडणूक लढविताना सर्वपक्षीय म्हणूनच हे संचालक निवडून आले होते. मात्र त्यानंतर महाविकास आघाडीने स्वतंत्र चूल तयार केली आणि दरेकर व लाड जोडीला चकवा दिला. लाड यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्या भेटीत त्यांना दिलासा मिळाला नसल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे.
वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार निवडणुकीच्या आधी सह्याद्री अतिथिगृहात अर्थ मंत्री अजित पवार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी एकत्र बैठक घेतली होती. या बैठकीसा शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. दोन्ही पक्षांनी मुंबई बँकेवरील भाजपचं वर्चस्वाला धक्का देत सत्ता परीवर्तन करण्याची रणनिती आखली होती. त्यानुसार मुंबई बँकेवर अध्यक्षपदी सिद्धार्थ कांबळे तर उपाध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर यांची उमेदवारी जाहीर केली होती. अजित पवार आणि आदित्य यांची रणनीती यशस्वी ठरली.
हा पराभव मान्य असल्याचे सांगत महाविकास आघाडीने दबावाचे राजकारण केल्यामुळे आमचे एक मत फुटल्याचे प्रवीण दरेकर यांनी निकालानंतर सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.