MP Udyanraje Bhosale
MP Udyanraje Bhosale 
मुंबई

हेवेदावे विसरून ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध करा : उदयनराजे भोसले

सरकारनामा ब्यूरो

सातारा : कोरोनामुळे गेल्या नऊ दहा महिन्यांपासून बळीराजासह ग्रामीण भागातील जनता त्रस्त आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील 900 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता अधिक आहे. त्यामुळे गावपातळीवरील कार्यकर्त्यांनी हेवेदावे सोडून सर्वांच्या वैचारिक सहकार्यातून या निवडणूका बिनविरोध केल्यास त्याचे चांगले व दूरगामी परिणाम दिसतील. तसेच या निवडणुका संपूर्ण देशाला नवी दिशा देणाऱ्या ठरतील. त्यामुळे गावपातळीवरील कार्यकर्त्यांनी हेवेदावे विसरून निवडणूका बिनविरोध कराव्यात, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर गावपातळीवरील कार्यकर्त्यांना खासदार उदयनराजे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे आवाहन केले आहे. ते म्हणतात, ग्रामपंचायती हा ग्रामविकासाचा पाया समजला जातो, तर ग्रामपंचायतीच्या निवडणूका या लोकशाहीचा पाया संबोधल्या जातात. गावात आज देखील निवडणुका सोडून अन्य बाबतीत गट-तट बाजुला ठेवून, यात्रा-जत्रा आणि गावाच्या विकासाचे उपक्रम राबविले जातात.

ग्रामीण भागात आज देखील केवळ कष्टकरी, शेतकरी वर्गामुळे माणुसकी टिकून आहे. तथापि निवडणूका आल्या की ईर्षा-चढाओढ आणि मी मोठा.. का तु मोठा.. यातून घमासान घडते. प्रसंगी अख्खे गाव वेठीस धरले जाते. पुढे किमान पाचवर्षे तरी हा राजकीय तणाव विकोपाला जातो. गावाचा विकासाला काही प्रमाणात का होईना, खीळ बसतेच. त्याही पेक्षा गावातील निकोप वातावरण गढुळ होते याची प्रचिती अनेक ठिकाणी दिसून आली आहे.

निवडणूका या लोकशाहीचा पाया समजल्या जात असल्या तरी त्या निकोप स्पर्धात्मक होणे हे अपेक्षित असते, तथापि, अलिकडच्या काळातील निवडणुका पाहिल्या तर जवळजवळ सर्वच गावांत दोन उभे गट पडलेले दिसुन येतात. तसेच सध्याची कोरोनाची पार्श्‍वभूमी पहाता, ग्रामीण भागातील जनता लॉकडाऊन, अनलॉक या प्रक्रियेमुळे मेटाकुटीला आली आहे. अशापरिस्थितीत जिल्हयातील सुमारे 900 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

या निवडणूका गावपातळीवरील असल्याने त्याचा धुरळा गावातील प्रत्येक घरात उडणार आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता अधिक आहे. त्याऐवजी हेवेदावे विरहित सर्वांच्या वैचारीक सहकार्यातुन बिनविरोध निवडणूका झाल्यास, त्याचे चांगले दूरगामी परिणाम दिसतील. गावाच्या एकीव्दारे गांव करील ते राव  काय करील.. ही म्हण सार्थ ठरविणाऱ्या या निवडणुका संपूर्ण देशाला नवी दिशा देणा-या ठरतील. त्यामुळे हेवेदावे विरहित बिनविरोध निवडणूका हे मर्म प्रत्येक कार्यकर्त्याने जाणुन घेऊन, आपल्या गावच्या हितासाठी साध्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT