Maharashtra DGP Rajnish Seth Sarkarnama
मुंबई

Maratha Reservation: हिंसक आंदोलनामुळे 12 कोटींच्या मालमत्तेचे नुकसान, 168 जाणांना अटक, तर...; पोलिस महासंचालकांची माहिती

Ganesh Thombare

Mumbai News: राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज आक्रमक झाला आहे. बीड जिल्ह्यासह राज्यातील काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरासह परिसरात जाळपोळ करण्यात आली होती.

यानंतर बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. जाळपोळीच्या घटनांनंतर बुधवारी राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी पत्रकार परिषद घेत बीडमधील परिस्थितीची माहिती देत आतापर्यंत किती जणांवर कारवाई करण्यात आली, किती जणांना अटक करण्यात आली, याबाबतची सविस्तर माहिती त्यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात 54 गुन्हे दाखल करण्यात आले असून, आतापर्यंत 106 जणांना अटक करण्यात आली, तर बीडमध्ये 20 गुन्हे दाखल करण्यात आले असून, या पैकी 307 कलमांतर्गत 7 गुन्हे दाखल करण्यात आलेत. संपूर्ण राज्यात 24 ते 31 ऑक्टोबर या दरम्यान जवळपास 140 गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच आतापर्यंत 146 जणांना नोटीस बजावण्यात आली. याबरोबरच आतापर्यंत 168 जणांना अटक करण्यात आली आहे," अशी माहिती रजनीश शेठ यांनी दिली.

तीन जिल्ह्यांत इंटरनेट बंद

बीड जिल्ह्यात जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर आता मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे. यामध्ये बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याची माहिती पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली.

राज्यात 12 कोटींच्या मालमत्तेचे नुकसान

मराठा आरक्षण आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागल्यानंतर महाराष्ट्रात 12 कोटींच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असल्याची माहिती रजनीश शेठ यांनी दिली. तसेच 'रॅपिड अॅक्शन फोर्स'ची एक टीम बीड जिल्ह्यात तैनात करण्यात आली असून, 'एसआरपीएफ'च्या तुकड्यांसह होमगार्डही तैनात करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सागितले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT