Devendra Fadnavis, Sudin Dhavalikar
Devendra Fadnavis, Sudin Dhavalikar Sarkarnama
मुंबई

फडणवीसांनी शब्द पाळला; मंत्रिमंडळातून दोनदा डच्चू दिलेल्या नेत्याला पुन्हा मंत्रिपद

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोव्यातील भाजप (BJP) सरकारच्या मंत्रिमंडळाचा तेरा दिवसांत विस्तार होत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या मंत्रिमंडळात आणखी तीन मंत्र्यांचा समावेश होणार असून आता हे मंत्रिमंडळ अकरा मंत्र्यांचं असेल. नवीन तीन मंत्र्यांमध्ये सध्या चर्चेत असलेले नाव म्हणजे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar). ते आधीच्या दोन भाजप सरकारमध्येही होते. पण राजकीय कारणास्तव त्यांना दोनदा मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता.

गोव्यात विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) बहुमत मिळण्याची खात्री भाजपला नव्हती. त्यामुळे निवडणूक निकालाच्या काही दिवस आधीपासून भाजपने जुळवाजुळव करण्यास सुरूवात केली होती. भाजपचा जुना मित्र असलेल्या मगोपकडेही पक्षाला जावे लागले होते. वास्तविक मगोपने निवडणुकीत तृणमूल काँग्रेसशी आघाडी केली होती. पण त्यांनी निवडणुकीनंतर भाजप सरकारला पाठिंबा देणार नाही, असंही जाहीर केलं नव्हतं. त्यामुळे गोवा भाजपचे प्रभारी व महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ढवळीकरांची निकालाआधी भेट घेतल्याची चर्चा होती.

भाजपची सत्ता आल्यानंतर फडणवीस यांनी ढवळीकरांना मंत्रिपदाचा शब्द दिला होता, अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. त्यानुसार भाजपला बहुमत न मिळाल्यानं मगोपनं पाठिंबा जाहीर केला. पण पहिल्या शपथविधीत मगोपच्या दोनपैकी एकालाही मंत्रिपद दिलं नाही. त्यामुळे आता लगेचच तेरा दिवसांनी होणाऱ्या विस्तारात ढवळीकरांना संधी देण्यात आल्याचे मानले जात आहे.

ढवळीकरांना दोनदा दिला होता डच्चू

मगोपनं 2007 पासून भाजपची साथ दिली आहे. कधी निवडणुकीआधी तर निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष सत्ते राहिले आहेत. 2012 मध्ये निवडणुकीआधी भाजपची युती केली होती. या निवडणुकीत त्यांना बहुमत मिळालं. पण तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची केंद्रीय संरक्षण मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर त्यानंतरचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि मगोपमध्ये खटके उडण्यास सुरूवात झाली. त्यानंतर ढवळीकरांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला.

मगोप आणि विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचेही फारसं जमत नाही. 2017 च्या निवडणुकीत मगोपला तीन जागा मिळाल्या होत्या. पर्रीकर यांच्या निधनांतर सावंत मुख्यमंत्री बनले. पण त्यानंतर काही दिवसांतच मगोपच्या दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या राजकीय घडामोडींनंतर ढवळीकरांना 2019 मध्ये मंत्रिमंडळातून काढण्यात आले. त्यानंतर पुन्हा तीन वर्षांनी ढवळीकरांना सावंतांच्याच मंत्रिमंडळात संधी मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT