Chandrakant Patil, Supriya Sule, Kapil Patil
Chandrakant Patil, Supriya Sule, Kapil Patil sarkarnama
मुंबई

'फडणवीस आणि राज ठाकरेंचे तरी ऐका; चंद्रकांतदादा वक्तव्य मागे घ्या!'

सरकारनामा ब्यूरो

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानवरुन त्यांच्यावर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या वक्तव्याचा निषेध केला. मात्र, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातूनही या विधानाचा समाचार घेण्यात आला आहे.

या संदर्भात लोक भारतीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील (Kapil Patil) यांनी या संदर्भात फेसबुक पोस्ट लिहित पाटील यांच्यावर सडकून टिका केली आहे. कपिल पाटील आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, चंद्रकांत दादा पाटील भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नसते तर दुर्लक्ष करता आले असते. इतके वाह्यात विधान चंद्रकांत दादा पाटील यांनी करावे हे क्लेशदायक आणि दुःखदायक आहे. मीडियाला प्रतिक्रिया देताना चंद्रकांत दादांनी उच्चारलेली दोन वाक्य, सहा शब्द अत्यंत आक्षेपार्ह आहेत. "तुम्ही घरी बसा आणि स्वयंपाक करा." असं चंद्रकांत दादा म्हणाले. हा तर मनुस्मृतीचा मंत्र आहे. 'न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति' सांगून मनुस्मृतीने स्त्रियांना पारतंत्र्यात लोटले, असा हल्लाबोल त्यांनी केला.

स्त्री ला घरी बसवण्याचा काळ कधीच संपलेला आहे. जिजामाता घरी बसल्या असत्या तर शिवाजी महाराज छत्रपती झाले नसते. स्वराज्याची पहाट झाली नसती. अहिल्याबाई होळकर घरी बसल्या असत्या तर लोकमाता झाल्या नसत्या. सावित्रीबाई फुले घरी बसल्या असत्या तर स्त्री शिक्षणाची पहाट झाली नसती. ताराबाई शिंदेंनी स्त्री पुरुष तुलना केली नसती तर स्त्रिया आज बरोबरीने उभ्या राहिल्या नसत्या. या महामानवींचा हा महाराष्ट्र आहे. इथे स्त्री द्वेषाला जागा नाही, असेही कपिल पाटील यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत दादा पाटील यांनी पुढचे वाक्य आणखीन भयंकर म्हटले आहे. "दिल्लीत जा,नाहीतर मसणात जा." केतकी चितळे शरद पवारांच्या मरणाची कामना करते. चंद्रकांत दादा तुम्ही सुप्रियाताईंना मसणात जा सांगता तेव्हा वेगळे काय बोलता आहात? कुणाच्या मरणाची कामना करणे ही कुणाची परंपरा आहे, असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

केतकीच्या बोलण्याचा समाचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही घेतला. निषेध केला. चंद्रकांत दादा आपण देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचं तरी ऐकणार का? चंद्रकांत दादा आपण आपले वक्तव्य मागे घ्या. टीका कठोर जरूर करा पण सभ्यतेच्या मर्यादा पाळा, असा सल्लाही कपिल पाटील यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT