Sunil Shelke
Sunil Shelke Sarkarnama
मुंबई

Sunil Shelke : सोमाटणे टोलनाका कायम बंदच्या मागणीसाठी आमदार शेळके विधानसभेत आक्रमक

सरकारनामा ब्युरो

Somatane Toll Plaza : राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. त्यात पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील सोमाटणे हा अनधिकृत टोलनाका बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ आमदार सुनील शेळके यांनी आज विधानसभेत आक्रमकपणे केली.

दरम्यान, मावळातील (Maval) सोमाटणे टोलनाका (Somatane Toll) बंद करण्याच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून स्थानिकांचे या टोलनाक्यावर उपोषण सुरु आहे. त्याठिकाणी काल रात्री सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट देऊन तूर्तास स्थानिकांच्या वाहनांना टोलमाफीची घोषणा केली होती. पण, ती तोंडाला पाने पुसण्यासारखी असून हा बेकायदेशीर टोलनाका बंदच करण्याची मागणी आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी विधानसभेत आक्रमकपणे लावून धरली.

आमदार सुनील शेळके म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबरोबर याप्रश्नी बैठक होणे गरजेचे आहे. तसेच तोडगा निघेपर्यंत या टोलनाक्यावरून सर्वच वाहनांना टोलमाफी द्यावी, ती सोडली जावीत." त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvelar) यांनी या प्रश्नाची नोंद घेण्यास सरकारला सांगितले आहे.

विधीमंडळाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन गाजवलेल्या आमदार शेळकेंनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातही छाप पाडली आहे. आपल्या मतदारसंघातील अनेक प्रश्न त्यांनी गत अधिवेशनात मांडले होते. तर, चालू अधिवेशनातही त्यांनी मतदारसंघातील सोमाटणे टोलनाक्याचा गंभीर प्रश्न आज उपस्थित केला. त्याअगोदर पुरवणी मागण्यांवरील चर्चेतही त्यांनी सहभाग घेतला होता.

राष्ट्रीय महामार्ग क्र ४८ वर हा टोल नाका आहे. राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम २०१८ नुसार ६० किलोमीटरच्या आत एकच टोल नाका असावा. या महामार्गावर मात्र सोमाटणे आणि वरसोली असे दोन टोल नाके ३१ किलोमीटरच्या अंतरातच आहेत. त्यामुळे सोमाटणे टोलनाका बंद करावा, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, २००६ मध्ये सुरू झालेल्या या टोल नाक्याची मुदत २०१९ मध्ये मुदत संपल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT