Shiv Sena, BJP, Congress, NCP Latest Marathi News
Shiv Sena, BJP, Congress, NCP Latest Marathi News sarkarnama
मुंबई

राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेस अन् सदाभाऊही माघार घेणार? आज फैसला

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत चमत्कार घडवत भाजपने तिसरा उमेदवारही निवडून आणला. त्यामुळे धक्का बसलेल्या महाविकास आघाडीला आता विधान परिषद निवडणुकीचं गणित सतावू लागलं आहे. या निवडणुकीतही आकडे भाजपच्या बाजूने नसले तरी सहा उमेदवार देण्यात आले आहेत. तर आघाडीचेही सहा उमेदवार रिंगणात आहेत. ही निवडणूक बिनविरोध करायची असेल तर काँग्रेसला एक उमेदवार आणि भाजपला सदाभाऊ खोत अर्ज मागे घ्यावा लागेल. याबाबत पुढील काही तासांतच फैसला होईल. (MLC Election Latest Marathi News)

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जून रोजी मतदान होणार आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दहा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभा निवडणूक जिंकल्यानंतर विधान परिषदेसाठी भाजप आक्रमक आहे. सहावी जागा लढवण्याचाही भाजपचा एक मतप्रवाह असल्याचे सांगितले जात आहे.

विधान परिषदेबद्दल आज दुपारी साडेबारा वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपची बैठक होणार आहे. भाजपने सहाव्या जागेसाठी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून सदाभाऊ खोत यांना मैदानात उतरवलं आहे. एका जागेसाठी 27 मतांचा कोटा आहे. भाजपचे संख्याबळ पाहता चार उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. पण त्यानंतरही भाजपने सहा उमेदवार दिले आहेत.

तर शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. काँग्रेसला दुसऱ्या जागेसाठी दहा मतांची गरज आहे. भाजपने राज्यसभा निवडणुकीत चमत्कार घडवत आघाडीला धक्का दिला आहे. त्यामुळे आता काँग्रेस दोन्ही उमेदवार मैदानात ठेवून भाजपला धक्का देणार की एकाचा अर्ज मागे घेऊन भाजपची वाट सुकर करणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

काँग्रेसने एक उमेदवारी अर्ज मागे घेतला तरी भाजप सदाभाऊ खोत यांना माघार घेण्यास सांगणार का, हाही प्रश्न आहे. सदाभाऊ यांनी माघार घेतली तरच ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते. अन्यथा या निवडणुकीतही चुरस वाढणार आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या भूमिकांकडे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीची मुंबईत बैठक

विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी ही बैठक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुनील तटकरे, अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल बैठकीसाठी उपस्थित असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT