मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या इशाऱ्यानंतर राज्यभरातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. राज्यात अनेक ठिकाणी सकाळी मशिदींमध्ये भोंग्यांविना नमाज झाले. आता एक वाजताचे नमाज पठण असून त्याआधी पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनाही पोलीस ताब्यात घेणार होते. पण राज ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या शिवतीर्ताबाहेरून देशपांडे हे पोलिसांच्या ताब्यातून निसटल्याचे समोर आले आहे. यावेळी एक महिला कर्मचारी जखमी झाली आहे. (MNS Sandeep Deshpande Latest News Updates)
संदीप देशपांडे हे सकाळी शिवतीर्थावर आले होते. याठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून येणाऱ्या कार्यकर्त्यांना तिथून जाण्यास सांगितले जात आहे. देशपांडेही तिथे आले होते. पोलीस त्यांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात होते. यावेळी माध्यमांशी बोलल्यानंतर पोलीस त्यांना घेऊन वाहनात बसवण्यासाठी नेत होते.
देशपांडे यांच्याभोवती पोलिसांसह माध्यमांच्या प्रतिनिधींचाही गराडा होता. पण तेवढ्यात देशपांडे यांच्या वाहनचालकाने त्यांची गाडी पोलिसांच्या वाहनाजवळ आणून उभी केली. पोलिसांची नजर चुकवून देशपांडे आपल्या गाडीत बसले आणि चालकाने थेट गाडी पुढे नेली. हे लक्षात येता पोलीस गाडीच्या मागे धावले पण तोपर्यंत गाडी निघून गेली होती. आता पोलीस देशपांडे यांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, शिवतीर्थाबाहेरून देशपांडे निसटून जात असताना एक महिला कर्मचारी धावपळीत पडल्याने जखमी झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे आता संदीप देशपांडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल होऊ शकतो. ही सर्व घटना माध्यमांच्या कॅमेरामध्ये कैद झाली आहे. आजच्या घडामोडींनंतर राज ठाकरे दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामध्ये ते आता कोणता नवा आदेश देणार, याकडे राज्याचे लक्ष लागलं आहे.
मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मे चा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर आता आजपासून राज्यभरातील मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन समाजात तेढ निर्माण होवू नये म्हणून सर्व मशिदींबाहेर आणि त्यातही विशेषतः संवेदनशील ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर काही मशिदींबाहेर भोंग्याविनाच अजान पार पडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.