MNS latest news
MNS latest news sarkarnama
मुंबई

MNS :"..जोतिषी नेमणे आहे ; मनसेनं उडवली शिंदे गटाची खिल्ली ; डोंबिवलीमध्ये झळकली रस्त्यांची 'कुंडली'

सरकारनामा ब्युरो

डोंबिवली : शिंदे गटाचा डोंबिवलीत आज (शुक्रवार) मेळावा आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्यावतीने (MNS) शहरात मध्यरात्री बॅनर लावण्यात आले आहेत. पावसामुळे कल्याण डोंबिवलीतील रस्ते खड्डे पडून खराब झाले आहेत .यावरुन मनसेने शिंदे गटाची (Shinde group) खिल्ली उडवली आहे. (MNS latest news)

डोंबिवली मधील एमआयडीसी निवासी परिसरात वर्क ऑर्डर होऊन दोन महिने उलटले तरी रस्त्याची कामे सुरु झालेली नाहीत. "कोणी मुहूर्त देतं का मुहूर्त" आणि "मुहूर्त नेमण्यासाठी ज्योतिषी नेमणे आहे," अशा आशयाचे बॅनर मनसे तर्फे लावण्यात आले आहेत. रस्त्यांच्या कामावरुन शिवसेना, भाजपा, मनसे यांच्यात टोलवाटोलवी सुरु असतानाच मनसेचे हे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डरची कॉपी त्या बॅनवर झळकविली आहे. त्यामुळे या बॅनरची आता शहरात चर्चा आहे. या बॅनरवर एमआयडीसीतील रस्त्यांची कुंडली मांडण्यात आली असून कामाचा मुहूर्त शोधण्यासाठी ज्योतिषी नेमणे आहे असे संदेश लिहून मनसेने शिवसेनेला डिवचले आहे.

एमआयडीसी निवासी भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यांच्या कामासाठी 110 कोटीचा निधी मंजुर करण्यात आला आहे. त्यातील 48 कोटीच्या कामांची निवीदा एमएमआरडीएने जाहीर केली होती. या कामाची वर्क ऑर्डर निघून दोन महिने झाले आहेत. अजून कामास सुरुवात झाली नसल्याने यावरुन मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेला लक्ष केले आहे.

पावसामुळे कल्याण डोंबिवलीतील रस्ते खड्डे पडून खराब झाले आहेत. एमआयडीसीतील रस्त्यांची गेले अनेक वर्षे डागडुजी न केल्याने त्यांची अवस्था तर अत्यंत दयनीय आहे. या रस्त्यांच्या कामासाठी 110 कोटीचा निधी मंजुर करुन आणल्याची घोषणा कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्याची मोठी बॅनरबाजी देखील झाली होती.

निवासी भागातील रस्ते काम कोणी करायचे यावरुन एमआयडीसी व केडीएमसी यांच्याकडे पुरेसा निधी नसल्याने एकमत होत नव्हते. यावर 50 - 50 टक्के भागीदारीत काम करण्याचे ठरले आणि एमएमआरडीएने 48 कोटी कामांच्या निविदा देखील मंजुर केल्या. या सर्व कामाचे श्रेय शिवसेनेने घेतले मात्र कामास विलंब होत असल्याने मनसेने त्यांना लक्ष केले आहे.

श्रेय घेण्याच्या नादात कामास दिरंगाई होत असल्याचे शिवसेनेच्या लक्षात येत नसल्याचे विधान आमदार पाटील यांनी याआधीच केले आहे. त्यानंतर आता शिंदे गटाच्या मेळाव्या आधीच शहरात बॅनरबाजी करुन मनसेने शिवसेनेला डिवचले आहे.

मनसे आमदार राजू पाटील म्हणाले, "एमआयडीसी निवासी भागातील रस्त्यांची 15 जुलै 2022 ला वर्क ऑर्डर निघाली आहे. ती ऑर्डर माझ्या हातात आहे, अजून का नाही त्याचे काम सुरु झाले. निवडणूकीच्या तोंडावर ही कामे सुरु करणार आहात का ?"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT