Ganesh Visarjan 2023  Sarkarnama
मुंबई

Ganesh Visarjan 2023 : राजकीय नेत्यांच्या कमानी बाप्पांच्या मार्गात ठरताहेत 'विघ्न'; मनसेकडून व्हिडिओ व्हायरल

Mangesh Mahale

Mumbai : बाप्पाची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज निरोप देण्यात येत आहे. मुंबई आणि पुण्यात गणपती विसर्जनासाठी गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहाेचला आहे. पण परतीच्या प्रवासाला निघालेल्या बाप्पाच्या मार्गात राजकीय नेत्यांमुळे 'अडथळा' निर्माण झाला आहे.

कल्याणमधील रस्त्यावर लागलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह राजकीय नेत्यांच्या कमानी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. कल्याण दुर्गाडी गणेश घाट परिसरात गणेश विसर्जन मार्गावर लागलेल्या नेत्यांच्या कमानीमुळे बाप्पा 'अडकले' आहेत. याचा व्हिडिओ मनसेचे आमदार राजू पाटील यांनी टि्वट करीत बॅनरबाजी करणाऱ्या नेत्यांना टोला लगावला आहे.

"हे गणराया पुढल्या वर्षी आपल्या आगमनापूर्वीच यांच्या राजकीय मुजोरीचे इथल्याच खाडीत विसर्जन करून इथल्या नागरिकांना सुखाचे व आनंदाचे दिवस दिसू दे," असे ट्विट राजू पाटील यांनी केले आहे. "गेल्या वर्षी राजकीय नेत्यांनी लावलेल्या कमानी पडून अपघात झाले होते. परंतु त्यावरून कोणताही शहाणपणा या राजकीय नेत्यांना आणि पालिका प्रशासनाला आला नाही. आता तर थेट बाप्पाच्या मिरवणुकीत अडवणूक या कमानीने करून ठेवली आहे," राजू पाटील यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

गणेश विसर्जनाच्या मार्गावर अशा प्रकारच्या कमानी लावू नयेत, अशी मागणी नागरिकांसह गणेश भक्तांनी केली होती. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

गणपती उत्सवात गणेश मंडळांसह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून भाविकांना शुभेच्छा दिल्या जातात. यंदाही अशा शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. दुर्गाडी चौकात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने मोठ्या कमानी लावल्या आहेत. या कमानीवर महामंडळाचे सदस्य आणि सर्वपक्षीय नेत्यांचे फोटो झळकले आहेत. कमानीमुळे वाहनचालक, नागरिकांना त्रास होत असून, तसेच बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला कमानी अडथळा ठरत आहेत. कमानीतून गणेशमूर्तीचे वाहने बाहेर काढण्यासाठी कार्यकर्त्यांना कसरत करावी लागत आहे, याकडे मनसेने लक्ष वेधले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT