sanjay raut
sanjay raut sarkarnama
मुंबई

Sanjay Raut यांच्यावर ईडीचा मोठा आरोप : प्रवीण राऊत यांच्याच पैशावर परदेश दौरे

सरकारनामा ब्युरो

मुंबई : पत्राचाळ घोटाळ्यातील आरोपी शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांना आज वैद्यकीय चाचणीनंतर दुपारी विशेष ईडी न्यायालयात (PMLA) हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने राऊतांना चार दिवसाची कोठडी (ता. ४ आँगस्टपर्यंत) सुनावली.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. न्यायालयाच्या परिसरात सुमारे दोनशे पोलीस तैनात होते. याशिवाय ED कार्यालयाबाहेर 100 पोलिस तैनात करण्यात आले होते. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मध्यरात्री मनी लाँड्रिंगच्या (Money Laundering) आरोपाखाली काल (रविवारी) राऊतांना अटक केली आहे.

नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली. आज एम.जी. देशपांडे यांच्या समोर राऊतांना हजर करण्यात आले. ईडीतर्फे वकील हितेन वेणेगावकर यांनी युक्तीवाद केला, तर अशोक मुंदरगी यांनी राऊतांकडून युक्तीवाद केला. माध्यमांच्या प्रतिनिधींना सुनावणीच्या वेळीस न्यायालयात येण्यास मज्जाव केला होता.

संजय राऊत यांना पत्राचाळीच्या व्यवहारात फायदा झाला, प्रवीण राऊत फक्त नावापुरते होते, राऊत तपासात सहकार्य करीत नाहीत. तीन वेळा समन्स दिले पण ते उपस्थित राहिले नाही. प्रवीण राऊतांच्या कंपनीकडून ५० कोटीपैकी १ कोटी ६ लाख रुपये राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते, असा युक्तीवाद ईडीच्या वकीलांनी केला.

ईडीनं आठ दिवसाची कोठडीची मागणी केली होती. अनेक गंभीर आरोप ईडीनं यावेळी केले.त्यांच्याकडे सखोल चौकशी करण्यासाठी कोठडी हवी असल्याचे ईडीनं सांगितले. त्यांनी गैरव्यवहाचे पैसे दादर, अलिबाग येथील सदनिका खरेदीसाठी केला. परदेशी सहलीसाठी प्रवीण परदेशी यांनी पैसे दिले होते, राऊतांनी साक्षीदारांना धमकविण्याचा प्रयत्न केला, असे ईडीच्या वकीलांनी सांगितले. राऊतांना घरचे जेवण, औषधं देण्यात हरकत नसल्याचे ईडीने सांगितले. रात्री साडेदहा वाजल्यानंतर त्यांची कोणतीही चौकशी करण्यात येणार नाही, असे ईडीच्या वकीलांनी सांगितले.

राऊतांवर राजकीय सुडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील सत्तापरिवर्तनानंतर राऊतांवर ही कारवाई करण्यात आली. राऊतांना ह्दयविकाराचा त्रास असल्याने त्यांना कोठडी द्यायची असेल तर कमी दिवसाची कोठडी द्यावी, असे अशोक मुंदरगी यांनी न्यायालयात सांगितले.कोठडीत असताना त्यांना वकीलांशी सल्लामसलत करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी विनंती राऊतांची वकीलांनी न्यायालयास केली.

रविवारी दिवसभर राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. शिवसैनिकांनी या वेळी ईडीविरोधात घोषणाबाजी करत कारवाईचा निषेध केला. राऊत यांनी ‘आपण झुकणार नाही, शिवसेना सोडणार नाही,’ असे स्पष्ट केले. गळ्यात भगव्या रंगाचा गमछा घातलेल्या राऊत यांनी घराबाहेर येताच हात उंचावून शिवसैनिकांना अभिवादन केले.

राऊत यांना बॅलार्ड इस्टेट परिसरातील ईडी कार्यालयात आणण्यात आले होते. तिथेही त्यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान,नवीन समन्स बजावल्याने त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी कार्यालयात नेण्यात आले होते.त्यांना काल मध्यरात्री अटक करण्यात आली. आज (सोमवारी) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी राऊत यांच्या मातोश्री भावुक दिसल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT