Vijay Wadettiwar Sarkarnama
मुंबई

Vijay Wadettiwar News : मंत्रालयात प्रवेशासाठी जाचक अटी; वडेट्टीवार सरकारवर भडकले

उत्तम कुटे

Mumbai News : आपल्या मागण्यांची तड न लागल्याने त्रस्त होऊन अनेकांनी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचे कार्यालय असलेल्या पाचव्या मजल्यावरून उड्या घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे तेथे संरक्षक जाळी बसविण्यात आली. तरीही त्यावर उड्या घेत आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरूच आहे. त्यामुळे आता मंत्रालयातील प्रवेशाच्या अटी मंगळवारी आणखी कडक झाल्या. त्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते कॉंग्रेसचे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

बीडमधील (Beed) एका तरुणाने शिक्षक भरतीच्या मागणीसाठी नुकतीच मंत्रालयाच्या जाळीवर उडी मारली. त्यानंतर राज्याच्या गृहविभागाने काल जीआर काढत मंत्रालय प्रवेशाच्या अटी आणखी कडक केल्या. त्यामुळे अगोदरच मंत्रालयातील जनतेचा अवघड असलेला प्रवेश आणखी जाचक झाला. परिणामी, खालील कार्यालये व तेथील अधिकाऱ्यांकडे कामे होत नसल्याने त्यासाठी मंत्रालयात येणाऱ्यांच्या वाटेतच मोठे विघ्न आले आहे. त्यामुळे त्यांची अवस्था भीक नको, पण कुत्रा आवर अशी झाली असून, त्यातून त्यांची कामे खोळंबणार आहेत.

दहा हजार रुपयांपेक्षा अधिकची रोकड घेऊन मंत्रालयात आता प्रवेश मिळणार नाही, अशी नवी अट टाकण्यात आली आहे. त्यातून मंत्रालयातील भ्रष्टाचार थांबेल, अशी भाबडी आशा सरकारची आहे. पण सध्या ऑनलाइनच्या जमान्यात भ्रष्टाचारही तसाच झाला असून, लाच त्याच मार्गाने घेतली जाते आहे. मग फक्त रोख रकमेतच पैसे घेणे म्हणजे भ्रष्टाचार वा लाचखोरी असे गृह विभागाला म्हणायचे आहे का, असा खरा प्रश्न आहे. तसेच मंत्रालय सुरक्षेसाठी आता ड्रोनची मदत घेतली जाणार आहे. पण सध्या ही यंत्रणाच नादुरुस्त आहे.

जरी ती दुरुस्त झाली, तरी जाळीवर उड्या मारणे कसे रोखणार, हाही सवाल आहे. त्यापेक्षा जनतेला मंत्रालयातच यावे लागणार नाही, यासाठी त्यांची कामे तालुका वा जिल्हा पातळीवर कशी होतील हे सरकारने म्हणजे सत्ताधाऱ्यांनी पाहिले पाहिजे. त्यासाठी प्रशासनाला त्यांनी कामाला लावण्याची गरज आहे.

'शासन आपल्या दारी' हा राज्य सरकारचा उपक्रम अपयशी ठरल्यानेच जनतेला शासनाच्या दारी (मंत्रालयात) जावे लागत आहे. पण त्यासाठी तिथेही आडकाठी (प्रवेशाच्या जाचक अटी) घालण्यात आल्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेते व कॉंग्रेसचे (Congress) नेते विजय वडेट्टीवार आज भडकले. सरकारने जनतेची कामे करावी त्यांना न्याय द्यावा, बंधने कशाला लादताय ? अशी विचारणा करीत त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले.

'शासन आपल्या दारी' उपक्रमावर कोट्यवधी रुपये खर्च या सरकारने केला. या उपक्रमात जनतेची कामे झाली असती, तर त्यांना मंत्रालयापर्यंत येण्याची गरज पडली असती का ? आंदोलन करण्याची वेळ आली असती का ? असे बोचरे व नेमके सवाल त्यांनी केले. 'शासन आपल्या दारी' उपक्रम पूर्ण अयशस्वी झाला असून, स्वतःची चमकोगिरी करण्यासाठी सतेत्तील तिघांनी सरकारी पैशांचा चुराडा केला हे आता स्पष्ट झाले आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT