Navneet Rana MRI
Navneet Rana MRI ANI
मुंबई

MRI चे फोटो व्हायरल केल्याने राणा दाम्पत्य ट्रोल; लिलावती हॉस्पिटल प्रशासनावरही टीका

सरकारनामा ब्युरो

मुंबई : न्यायालयीन कोठडीतून जामिन मिळालेल्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना सध्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवार (५ मे) पासून त्यांच्यावर स्पॉन्डॅलिसिसचे उपचार सुरु आहेत. खासदार राणा यांना मानदुखीचा त्रास सुरू झाला होता. दरम्यान आज राणा यांचे एमआरआय स्कॅन आणि फुल बॉडी चेकअप करण्यात आले. मात्र नवनीत राणा यांच्या ऑफिसने एमआरआय करतेवेळचे फोटो व्हायरल केल्याने त्यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. तसेच फोटो काढण्याची परवानगी दिल्याने लिलावती हॉस्पिटल प्रशासनाला देखील टीकेचे धनी व्हावे लागले आहे.

ANI वृत्तसंस्थेने त्यांच्या ट्विटर हॅन्डेलवरती खासदार राणा यांच्या ऑफिसच्या वतीने हे फोटो शेअर केल्यानंतर युजर्सनी राणा आणि हॉस्पिटल प्रशासनावरती टीका करायला सुरुवात केली. लिलावती हॉस्पिटल लॅबच्या आतमध्ये फोटो काढण्यासाठी माध्यमांना परवानगी देते का? असा सवाल विचारला आहे.

तसेच हे सुरक्षा मानकांचे उल्लंघन नाही का? असा सवालही काही युजर्सनी विचारला आहे.

तर एका युजरने एमआरआय मशिनच्या आतमध्ये देखील कॅमेऱ्यावरुन फोटो काढण्यासाठी परवानगी मागितली आहे.

डिस्चार्जनंतर राणा दाम्पत्य दिल्लीला जाण्याच्या तयारीत

दरम्यान सध्याचे उपचार पूर्ण झाल्यानंतर खासदार राणा यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर राणा दाम्पत्य थेट दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती आहे. दिल्लीत जावून नवनीत राणा या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राणा यांंनी यापूर्वी आपल्या वकिलांमार्फत लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे.

यात आपण मागासवर्गीय असल्याने खार पोलीस ठाण्यात पाणीही देण्यात आले नाही. आपला छळ केल्याचा आरोप राणांनी केला आहे. त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी खार पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्य चहा पितानाचा व्हिडीओ ट्विट केला होता. या आरोप-प्रत्यारोपांमुळे काही काळा राजकारण तापलं होतं.

लोकसभा अध्यक्षांशिवाय राणा दाम्पत्य गृहमंत्री अमित शहा आणि गृहसचिवांची यांची भेट घेवून घडलेला सर्व प्रकार त्यांच्या कानावर घालण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांना केंद्रीय गृह मंत्रालयाची सुरक्षा प्राप्त आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्य ठाकरे सरकारला थेट दिल्लीतून अडचणीत आणण्याची शक्यता आहे. यावर आता ठाकरे सरकार काय भूमिका घेणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT