मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs case) प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानसह (Aryan Khan) इतर आरोपींचा जामीन अर्ज 20 ऑक्टोबरला न्यायालयाने फेटाळला होता. या प्रकरणी आर्यन याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आर्यनने ड्रग्ज घेतले नव्हते तसेच, त्याच्या ताब्यातून काहीही जप्त करण्यात आलेले नाही, असा दावा माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) यांनी केला आहे.
आर्यनच्या वतीने बाजू मांडताना रोहतगी म्हणाले की, आर्यनने ड्रग्ज घेतलेले नाही. तसेच, त्याच्या ताब्यातून काहीही जप्त करण्यात आलेले नाही. या प्रकरणी माझ्या अशिलाविरोधात कोणताही गुन्हा दिसत नाही. असे असतानाही या मुलाला 20 दिवस तुरुंगात का ठेवण्यात आले. एनसीबी दाखवत असलेले व्हॉट्सअॅप चॅटे 2018 मधील आहेत. त्यांचा आताच्या क्रूझवरील पार्टीशी काहीही संबंध नाही.
आर्यन खान हा 17 वर्षांचा असतानाचे त्याचे व्हॉट्सअॅप चॅट एनसीबी दाखवत आहे. त्यात केवळ ऑनलाइन पोकर खेळण्याचा उल्लेख आहे. हे चॅट क्रूझवरील नाही. ही लहान मुले आहेत. त्यांच्याकडे छोट्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्यास त्यांना सुधारगृहात पाठवले जाऊ शकते. त्यांच्यावर खटला चालवून त्यांना गुन्हेगार ठरवू नये. केंद्रीय सामाजिक मंत्रालयानेही हेच मत व्यक्त केले आहे, असेही रोहतगी यांनी स्पष्ट केले.
अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने (NCB) आर्यनला 2 ऑक्टोबरला पकडले होते. तो 8 ऑक्टोबरपासून तुरुंगात आहे. आर्यनच्या जामिनावर आज सुनावणी सुरू आहे. आर्यनच्या वतीने माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी हे बाजू मांडत आहेत. रोहतगी हे आर्यनची बाजू मांडणार असल्याचे आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आर्यन खानला आज उच्च न्यायालयाकडून जामीन मिळणार की नाही उत्सुकता आहे.
मागील आठवड्यात सत्र न्यायालयात आर्यन खानच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई व सतीश मानेशिंदे यांन बाजू मांडली होती. एनसीबीकडून अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिलसिंह यानी बाजू मांडली होती. एनसीबीने आर्यनच्या व्हॉट्स अॅप चॅटची माहिती न्यायालयात सादर केली होती. तसेच काही जुन्या डॅग्ज प्रकरणांचा संदर्भही न्यायालयाला दिला होता. त्याचआधारे न्यायालयाने आर्यनचा जामीन फेटाळला होता. त्याच्यासोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा जामीनही फेटाळण्यात आला होता. त्यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
सत्र न्यायालयाने आर्यनचा जामीन फेटाळण्यामागे व्हॉट्स अॅप चॅट आणि त्याच्यासोबतच्या इतर जणांकडे डॅग्ज सापडणे हे आर्यनला भोवल्याचे समोर आले होते. बॉलिवूड अभिनेता शाहरुखचा 23 वर्षीय मुलगा आर्यन खान याला एनसीबीने 2 ऑक्टोबरला मुंबई किनाऱ्यावरील क्रूझवर छाप्यादरम्यान अटक केली होती. यानंतर 7 ऑक्टोबरला न्यायालयाने आर्यनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सध्या तो मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यन खानसोबत एनसीबीने आणखी सात जणांनाही अटक केली होती. या प्रकरणात परदेशी नागरिक आणि कथित अमली पदार्थ तस्करांसह एकूण वीस जणांना अटक करण्यात आली आहे.
आर्यन खानसह अटक केलेल्या इतर सात जणांमध्ये मुनमुन धामेचा, अरबाज मर्चंट, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, गोमित चोप्रा, नुपूर सतिजा आणि विक्रांत छोकर यांचा समावेश आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी छाप्यादरम्यान 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस, एमडीएमए (एक्स्टसी) च्या 22 गोळ्या आणि 1.33 लाख रुपये जप्त केले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.