50 Lakh Cash Box Video Controversy : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांनी भरलेल्या बॉक्सचा एक व्हिडीओ समोर आणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी खळबळ उडवून दिली आहे. हा व्हिडीओ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कुलाबा येथील शाखाप्रमुख संतोष पवार यांचा असल्याचा दावा देशपांडे यांनी केला आहे.
या व्हिडीओमध्ये संतोष पवार हे वरिष्ठ नेत्याकडून नोटांनी भरलेला बॉक्स मिळाल्याचे सांगताना दिसत आहेत. या बॉक्समध्ये अंदाजे 50 लाख रुपये असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सत्यता पडताळून सखोल चौकशी करण्याची मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे.
संतोष पवार यांनी संबंधित व्हिडीओमध्ये बॉक्स उघडून दाखवताना त्यामध्ये नोटांची बंडले असल्याचे सांगितले आहे. या बॉक्समध्ये अंदाजे 50 लाख रुपये असतील, असा दावा त्यांनी केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत मनसेचे (MNS) संदीप देशपांडे यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संतोष पवार यांनीच या पैशांबाबत स्पष्टीकरण द्यावे. एका वरिष्ठ नेत्याने हे पैसे दिल्याचे ते सांगत असतील, तर त्या नेत्याकडे एवढी मोठी रक्कम आली कुठून, याचीही चौकशी झाली पाहिजे, असे देशपांडे म्हणाले.
मुंबई महापालिकेच्या (BMC) प्रभाग क्रमांक 226 मधील निवडणुकीचा संदर्भ देत संदीप देशपांडे यांनी या प्रकरणातील संशय अधिक गडद असल्याचे म्हटले आहे. या प्रभागातून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर हे भाजपच्या उमेदवारीवर जिंकून आले आहेत. या प्रभागातील निवडणूक वेगवेगळ्या व्यवहारांच्या कारणांनी चांगलीच गाजली होती. या प्रभागात निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होती. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होती. मात्र, मनसेच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला. त्यानंतर अपक्ष उमेदवार सेजल पवार या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्या यापूर्वी शिंदे शिवसेनेत होत्या, असा दावाही देशपांडे यांनी केला.
या पार्श्वभूमीवर संतोष पवार यांना आधीच पैसे देण्यात आले होते की, संबंधित उमेदवाराने निवडणुकीत काही भूमिका घेऊ नये म्हणून पैसे देण्यात आले होते, असा सवाल मनसेचे संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. हे पैसे नेमके कोणत्या कारणासाठी देण्यात आले आणि त्यामागचा उद्देश काय होता, हे संतोष पवारच स्पष्ट करू शकतील, असेही ते म्हणाले.
या प्रकरणामागे महायुतीतील नेत्यांमधील काही राजकीय समीकरण असण्याची शक्यताही संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली. मात्र, व्हिडीओमध्ये ज्या पद्धतीने पैशांची बंडले दाखवण्यात आली आहेत, त्यावरून निवडणुकीतील आर्थिक व्यवहारांचा प्रश्न गंभीर असल्याचे ते म्हणाले. अशा पद्धतीने पैशांच्या जोरावर निवडणुका लढवल्या जात असतील, तर ते लोकशाहीसाठी योग्य नाही. एका बॉक्समध्ये भरलेली एवढी मोठी रोकड दाखवणारा हा दुर्मिळ व्हिडीओ असून, तो आपण समोर आणला आहे, असेही देशपांडे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची केवळ सरकारनेच नव्हे, तर निवडणूक आयोगानेही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. ही घटना निवडणूक काळातील असल्याने तिची सत्यता तपासणे आवश्यक असल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणावर शिंदेसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल. मात्र, संदीप देशपांडे यांना असे व्हिडीओ नेमके कुठून मिळतात, याचीही पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात गृहमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. त्यामुळे पैशांनी भरलेल्या बॉक्सचा कथित व्हिडीओ, त्यातील 50 लाख रुपयांचा दावा आणि प्रभाग क्रमांक 226 मधील निवडणुकीचे राजकारण यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. आता या व्हिडीओची सत्यता तपासल्यानंतर नेमके काय समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.