Advay Hire News : शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेते अद्वय हिरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मालेगावातील रेणुका देवी सहकारी सूतगिरीणीसाठी घेतलेले कर्ज थकविल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या अद्वय हिरे यांना सोमवारी मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. अद्वय हिरे हे मागील नऊ महिन्यांपासून तुरूंगात आहेत.
'आप'चे नेते मनीष सिसोदिया यांच्या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा ( Supreme Court ) संदर्भ देत न्यायमूर्ती माधव जामदार यांनी अद्वय हिरे यांच्या सुटकेचा आदेश दिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी अद्वय हिरे ( Advay Hire ) तुरुंगातून बाहेर येणार आहेत.
नेमकं प्रकरण काय?
नाशिक जिल्हा बँकेकडून रेणुका सहकारी सूतगिरणीला 7.48 कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. एक कर्ज तीन टप्प्यात वितरित करण्यात आले. यातील दोन टप्प्यात बँकेने कर्ज वितरणाची शिफारस केलेली नव्हती. सूतगिरणी प्रकल्प उभारणीसाठी दिलेल्या या कर्जाच्या उपयोग प्रत्यक्ष सूतगिरणीसाठी झाला नाही. मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम अन्य बँकेच्या खात्यात वर्ग करण्यात आली. हे करताना बँकेच्या नियमांचे उल्लंघन झाले.
विशेष म्हणजे ज्या व्यंकटेश बँकेत हा निधी वर्ग झाला, त्याचे अध्यक्ष प्रशांत हिरे होते. ज्या संस्थेला कर्ज मंजूर झाले, त्या रेणुका देवी सूत गिरणीच्या अध्यक्षा स्मिता हिरे होत्या. या कालावधीत अद्वय हिरे स्वतः जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांनी आपल्या अधिकाऱ्याचा गैरवापर करून हे कर्ज मंजूर केल्याचा आरोप बँक प्रशासनानं केला होता.
कर्जाची परतफेड न झाल्यानं जिल्हा बँकेनं याबाबत वारंवार पाठपुरावा केला. त्यात काहीही प्रतिसाद मिळाला नसल्यानं मालेगावातील रमजानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी हिरे यांना 15 नोव्हेंबर 2023 रोजी अटक केली होती. 23 नोव्हेंबर 2023 रोजी हिरे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते.
त्यांनी वकील चेतन पाटील यांच्यामार्फत जामिनासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांच्या अर्जावर न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यापुढे सुनावणी झाली. यावेळी हिरे यांच्यातर्फे सिनिअर कौन्सिल आबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला. तर, पोलिसांकडून अतिरिक्त सरकारी वकील पांडुरंग गायकवाड यांनी बाजू मांडली. दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती जमादार यांनी हिरे यांना 5 लाखांच्या जातमुचकल्यावर तुरुंगातून सोडून देण्याचे आदेश दिले.
आणखी कोठडीत ठेवण्याची गरज नाही...
कथित गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला आहे. या प्रकरणात अद्याप आरोप निश्चिती झालेली नाही. खटला सुरू होण्याआधीच हिरे हे मागील नऊ महिने नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत. खटल्याला आणखी विलंब होऊ शकते. अशा परिस्थितीत त्यांना आणखी कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद पोंडा यांनी केला. तसेच, आम आदमी पक्षाचे नेते, मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेल्या निरीक्षणांकडे लक्ष वेधलं. त्यांच्या युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्ती जामदार यांनी हिरे यांना जामीन मंजूर केला.
भुसे विरुद्ध हिरे लढतीची शक्यता...
दरम्यान, ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर अद्वय हिरे यांनी मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे यांना आव्हान दिलं होतं. त्यानंतर अद्वय हिरे यांच्यावर विविध गुन्हे दाखल झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. त्यातच विधानसभेपूर्वीच अद्वय हिरेंना जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे मालेगाव बाह्य मतदारसंघात अद्वय हिरे विरुद्ध दादा भुसे यांच्यात लढत अटळ असल्याचं मानलं जात आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.