Konkan community identity : कोकणातून मुंबईसह अन्य शहरांमध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिकांना यापुढे ‘चाकरमानी’ असे न म्हणता त्यांना ‘कोकणवासीय’ म्हणून संबोधण्यात यावे, असे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत.
'चाकरमानी', असे अवमानकारक संबोधन हटवून अजित पवार यांनी कोकणवासीयांचा स्वाभिमान जागवल्याचे मानले जात आहे. यासंदर्भात महायुती सरकार लवकरच परिपत्रक काढणार आहे, असे संकेत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या अनुषंगाने यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) , रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकत्याच मंत्रालयात पार बैठक झाली. या बैठकीत कोकणवासीयांच्या काही संघटनांनी 'चाकरमानी' हा शब्द अपमानकारक वाटत असल्याने सरकारी कागदपत्रे आणि सरकारी कामकाजात, त्याऐवजी 'कोकणवासीय' हा शब्द वापरण्याची आग्रही मागणी केली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत यापुढे 'चाकरमानी' शब्दाऐवजी 'कोकणवासीय' म्हणून संबोधण्याबाबत निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत. गणेशोत्सवापूर्वी याबाबतचे सरकारी परिपत्रक निघण्याचे संकेत आहेत. 'चाकरमानी' हा शब्द अपमानकारक वाटत असल्याने 'कोकणवासीय' नागरिकांच्या काही संघटनांनी केलेल्या मागणीनुसार महायुती सरकारकडून याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
'चाकरमानी' हा मराठी शब्द प्रामुख्याने कोकणातून (Konkan) मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतरित झालेल्या व्यक्तींसाठी वापरला जातो. गेल्या अनेक दशकांपासून कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतील नागरिक कामाच्या, नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये राहून उदरनिर्वाह करतात; परंतु या नागरिकांनी कोकणची सांस्कृतिक ओळख आणि कोकणाशी असलेले कौटुंबिक नाळ जोडून ठेवली आहे. शिमगा, गणेशोत्सव, दिवाळी किंवा इतर सणांसाठी हे लोक मोठ्या संख्येने आपल्या गावी परतत असतात. यादरम्यान त्यांचा चाकरमानी म्हणून उल्लेख केला जातो.
चाकरमानी हा शब्द ‘चाकर’ (सेवक) आणि ‘मानी’ (मानणारा) यांच्या संयोगातून तयार झाला आहे; मात्र कोकणवासीयांच्या काही संघटनांना हा शब्द कमीपणाचा वाटत असल्याने त्यांनी या शब्दावर हरकत घेतली आहे. त्यांच्या मते हा शब्द कोकणवासीयांच्या मेहनतीला आणि स्वाभिमानाला कमी लेखणारा आहे. त्यामुळे या संघटनांच्या मागणीनुसार महायुती सरकारकडून चाकरमानी शब्दाऐवजी कोकणवासीयांच्या स्वाभिमानाला आणि सांस्कृतिक ओळखीला अधिक सन्मान देण्यासाठी ‘कोकणवासीय’ हा शब्द वापरण्याचा प्रस्ताव आता पुढे येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.