Mumbai

 

Sarkarnama

मुंबई

राज्यात कोरोनाची तिसरी लाट? मुंबईत 24 तासांत तब्बल 82 टक्के रुग्ण वाढले

मागील 24 तासांत कोरोना रुग्णसंख्येत मुंबईत (Mumbai) मोठी वाढ झाल्याने तिसरी लाट (Third Wave) आल्याची चिन्हे आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : कोरोना (Covid-19) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराचा धोका वाढला आहे . या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी कठोर निर्बंध घातले आहेत. महाराष्ट्र (Mahrashtra) आणि दिल्ली सरकारनेही असे निर्बंध घातले आहेत. तरीही मागील 24 तासांत कोरोना रुग्णसंख्येत मुंबईत (Mumbai) 82 टक्के वाढ झाली आहे. यामुळे कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) सुरू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत मागील 24 तासांत 82 टक्के वाढ झाली आहे. आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत मागील 24 तासांत मुंबईत कोरोनाचे 2 हजार 510 रुग्ण आढळले आहेत. काल कोरोनाचे 1 हजार 377 रुग्ण आढळले होते. काल रुग्णसंख्या 70 टक्क्यांनी वाढली होती. आज ती 82 टक्क्यांनी वाढली आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतेच निर्बंध जाहीर केले आहेत. यानंतर मुंबई महापालिकेनेही निर्बंध लागू केले आहेत. असे असले तरी रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे मुंबई महापालिकेसह राज्य सरकारची चिंता वाढली आहे.

मुंबईत आज सायंकाळी 6 पर्यंत मागील 24 तासांत 251 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 8 हजार 66 आहे. याचबरोबर रुग्ण दुपटीचा दर 682 दिवस आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. दरम्यान, मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शहरातील नववर्षाच्या कार्यक्रमांवर निर्बंध घालण्याचे आल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

डेल्टाच्या जागी आता ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे तिसरी लाट पुढील वर्षाच्या सुरवातीला येईल, असा अंदाज आहे. भारतात ओमिक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. परंतु, ही लाट दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य असेल. तिसरी लाट भारतात पुढील वर्षीच्या सुरवातीला येईल. ही लाट फेब्रुवारी महिन्यात उच्चांकी पातळीवर पोचेल, असाही अंदाज आहे. ओमिक्रॉन हा अतिशय वेगाने संसर्ग होणारा आहे. यामुळे केंद्रासह राज्यांच्या आरोग्य यंत्रणा धास्तावल्या आहेत. केंद्र सरकार यामुळे खडबडून जागे झाले आहे. केंद्र सरकारने कोरोनाचे रुग्ण जास्त आढळणाऱ्या 10 राज्यांमध्ये पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT