Thackeray Vs Shinde: Sarkarnama
मुंबई

Mumbra News: ठाकरेंचे बॅनर फाडले; आव्हाडांकडून Video शेअर; दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमनेसामने येणार...

Mangesh Mahale

Mumbai: मुंब्रा येथील ठाकरे गटाची शाखा शिंदे गटाने ताब्यात घेतली आहे. यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात जुंपली आहे. काही दिवसांपूर्वी या शाखेचे कार्यालय बुलडोझरने भुईसपाट करण्यात आले आहे. या घटनेनंतर ठाकरे गट संतप्त झाला आहे. आज (शनिवारी) उद्धव ठाकरे हे दुपारी या शाखेला भेट देणार आहेत. यानिमित्ताने ठाकरेंच्या दौऱ्याचे लावलेले मुंब्रा येथील बॅनर फाडण्यात आले आहेत. याचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टि्वट केला आहे. आव्हाडांनी संताप व्यक्त केला आहे.

उद्धव ठाकरे हे आज मुंब्रा येथे येणार असल्याने परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंब्रा येथील शिवसेनेच्या शाखेतील वादानंतर आता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना 149 च्या नोटीस देण्यात आल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राजन किणे यांना मुंब्रा पोलिसांकडून 149 ची नोटीस देण्यात आली आहे. शिंदे गटाच्या 10 तर ठाकरे गटाचे 5 कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे. काल (शुक्रवारी) रात्री पोलिसांनी परिसराचा आढावा घेतला आहे. परिस्थिती पाहून या ठिकाणी एसआरपीच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत.

भाडे तत्त्वावर शाखा दिली होती...

उद्धव ठाकरे दुपारी चारच्या सुमारास उद्धव ठाकरे या शाखेच्या भेटीला येणार आहेत, त्या पूर्वीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शिंदे गटाच्या वतीने खारी गाव या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्या बॅनरवर संजय वाटोळे चे पाप...असा आशय लिहिण्यात आला आहे. भाडेतत्त्वावर शाखा दिली होती. त्या ठिकाणी नवीन शाखेची बांधणी होणार अशा आशयाचे फलक शिंदे गटाने लावले आहेत.

बाळासाहेब ठाकरेंचा अपमान

"शिवसेनेच्या आयत्या शाखा ताब्यात घेणे. त्यावर बुलडोझर फिरवून घटनाबाह्य मुखमंत्र्यांचा जय करणे ही विकृती आहे. मुंब्रा येथे शाखेवर बुलडोझर फिरवून ज्यांनी पाप केले, त्यांचा हिशोब होईल," असा इशारा राऊतांनी शिंदे गटाला दिला आहे. "हा शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे," अशा शब्दांत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे.

पुन्हा एकदा वाद पेटला...

ठाकरे गटाच्या शाखा ताब्यात घेण्यावरून मुंबईत सध्या दोन्ही गटांत वाद चिघळला आहे. मुंब्रा येथील शाखा शिंदे गटाने ताब्यात घेतली आहे. यावरून ठाकरे-शिंदे गटांमध्ये पुन्हा एकदा वाद पेटला आहे. ही शाखा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी सुरू केली होती. आनंद दिघेंच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंनी ठाण्यातील शाखांवर लक्ष केंद्रित केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT