maharashtra election commission Sarkarnama
मुंबई

Municipal Council By Election : नगरपरिषद व नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी 11 ऑगस्टला मतदान !

Chaitanya Machale

Mumbai News : राज्यातील विविध नगरपंचायती आणि एका नगरपरिषदेमधील रिक्त जागांच्या सदस्यपदांसाठी तर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले नगरपंचायतीच्या थेट अध्यक्षपदाच्या रिक्त जागांसाठी पुढील महिन्यात मतदान होणार आहे.

गेले काही महिन्यांपासून विविध कारणांनी रिक्त असलेल्या 11 सदस्यांच्या जागांसाठी ही पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. पुढील महिन्यात म्हणजे 11 ऑगस्टला या जागांसाठी पोटनिवडणूक होणार असून या दिवशी मतदान होणार आहे.

राज्यातील ज्या नगरपंचायती आणि नगरपरिषदेच्या जागा रिक्त आहेत. त्या जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला आहे. त्यानुसार या रिक्त जागांसाठी मतदान पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यामध्ये महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीकडून तीन उमेदवार रिंगणात उतरले होते.

या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी राज्य निवडणूक आयोगाने (State Election) राज्यातील विविध नगरपंचायती व एका नगरपरिषदेच्या एकूण 11 सदस्यपदांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली.

यामध्ये खालापूर, पाली (जि. रायगड), निफाड, सुरगाणा (जि. नाशिक), बोदवड (जि. जळगाव), धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु. (जि. नंदुरबार), कवठेमहांकाळ, खानापूर (जि. सांगली), चंदगड (जि. कोल्हापूर) आणि बाभुळगाव (जि. यवतमाळ) या नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या प्रत्येकी एका रिक्त जागेसाठी मतदान होईल. त्याचबरोबर कन्हान-पिंपरी (जि. नागपूर) नगरपरिषदेच्या सदस्यपदाच्या एका रिक्त जागेसाठी देखील मतदान होणार आहे.

या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 18 ते 24 जुलै 2024 या कालावधीत स्वीकारली जाणार आहेत. मात्र रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. 25 जुलै 2024 ला अर्जांची छाननी होईल. त्यानंतर 11 ऑगस्टला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान (Voting) होईल. याची मतमोजणी 12 ऑगस्टला होईल, असेही राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT