Pune college news : पुण्यातील एका महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेला दहा वर्षे उलटून गेली आहे. याप्रकरणात मुंबईत हायकोर्टाने संबंधित महाविद्यालयाचे विश्वस्त, प्राचार्य आणि कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे.
कोर्टाने त्यांच्यावरील गुन्हा रद्द करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. केवळ दुर्घटना घडली किंवा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला म्हणून महाविद्यालयातील संबंधित व्यक्तींना निष्काळजीपणासाठी जबाबदार धरता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षणही कोर्टाने नोंदविले आहे.
मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने हा निकाल दिला आहे. मृत्यू आणि आरोपींची विशिष्ट निष्काळजी कृती यांच्यात थेट आणि निकटचा संबंध असणे आवश्यक असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाने समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षेबाबत नाराजी व्यक्त केली असून सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी हा आजही गंभीर चिंतेचा विषय असल्याचे नमूद केले.
पुण्यातील आबेदा इनामदार महाविद्यालयाने १ फेब्रुवारी २०१६ रोजी मुरूड समुद्रकिनाऱ्यावर सहलीचे आयोजन केले होते. त्यावेळी ४१ विद्यार्थ्यांपैकी १४ विद्यार्थ्यांच्या समुद्रात बुडून मृत्यू झाला होता.
कोर्टाने म्हटले की, दुर्घटनेतील सर्व विद्यार्थी हे सुज्ञ होते. एक सज्ञान व्यक्ती स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम असतात. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयातून दुर्घटना घडल्यास, केवळ त्यांच्यासोबत असलेल्या शिक्षकांवर किंवा महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावर आपोआप फौजदारी जबाबदारी निश्चित करता येणार नाही.
विश्वस्त आणि महाविद्यालयाचे पदाधिकारी दुर्घटनेच्या ठिकाणी उपस्थित नव्हते. तसेच विद्यार्थ्यांसोबत गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही त्यांच्या विशिष्ट निष्काळजी कृतीमुळेच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, हे सिद्ध करणारा पुरेसा पुरावा उपलब्ध नसल्याचे कोर्टाने आदेशात स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणातून विश्वस्त, प्राचार्य आणि कर्मचाऱ्यांची सुटका झाली आहे.
समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत राज्य सरकारने गांभीर्याने विचार करावा, असे आदेशही कोर्टाने दिले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुण्यातील आळंदी येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या ८ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. हे विद्यार्थी दिवेआगार येथे सहलीसाठी गेले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.