Nana Patole and Devendra Fadanvis
Nana Patole and Devendra Fadanvis Sarkarnama
मुंबई

नाना पटोलेंचा फडणविसांवर बॉम्ब : 'ते' ८०० कोटी रुपये कुठे गेले?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात तत्कालीन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने मोठा भ्रष्टाचार केला आहे. पुनर्वसन प्रकल्पासाठीच्या ४५ एकर जमिनीसाठी फडणवीस सरकारने रेल्वेला ८०० कोटी दिले. मात्र आजपर्यंत संबंधित जमीन राज्य सरकाला हस्तांतरित झालेली नाही किंवा ते ८०० कोटी रुपये देखील परत मिळालेले नाहीत. ही जनतेच्या पैशाची लूट असून या घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. मुंबईतील टिळक भवनमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.

नाना पटोले म्हणाले, धारावीतील लोकांना चांगली घरे मिळावीत, धारावीचा कायापालट व्हावा, मुंबई स्वच्छ व सुंदर व्हावी यासाठी विलासराव देशमुख यांचे सरकार असताना धारावीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पुनर्वसन प्रकल्पाची योजना मांडली होती. परंतु काही कारणास्तव ती योजना पुढे जावू शकली नाही. पुढे ही योजना देवेंद्र फडणवीस सरकारने सुरु केली.

याकामी फडणवीस सरकारने ८०० कोटी रुपये रेल्वेला जमिनीसाठी दिले पण आजपर्यंत त्या योजनेचे काम पुढे गेले नाही. जमिनही हस्तांतरीत झालेली नाही आणि पैसेही परत आलेले नाहीत. ह्या पैशाचे काय झाले? योजना का फसली? जनतेचे पैसे रेल्वेला दान करण्याचा अधिकार फडणीवीस यांना कोणी दिला? याची चौकशी एसआयटीचे गठन करून त्यामार्फत करावी, हवे तर ईडी व सीबीआय चौकशीसाठी शिफारस करावी अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. हा प्रश्न आम्ही अधिवेशनातही उपस्थित करणार आहोत, असेही पटोले सांगितले आहे.

शुक्ला यांच्यावर ५०० कोटींचा दावा ठोकणार :

रश्मी शुक्ला पुणे पोलिस आयुक्त असताना त्यांनी माझा टॅप केला. पोलिसांनी याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पण हे माझी बदनामी करण्याचे काम आहे आणि या व्यक्तिगत बदनामी बद्दल मी रश्मी शुक्ला आणि संबंधित व्यक्तींवर ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार आहे. याशिवाय सध्या मुख्य आरोपी म्हणून केवळ रश्मी शुक्ला यांचेच नाव समोर आले आहे. मात्र अधिक चौकशी करुन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जर यामध्ये सहभाग असेल तर त्यांच्यावर ही कारवाई केली जाईल, असे पटोले यांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT