nana patole sarkarnama
मुंबई

Akshay shinde news : अक्षय शिंदेंचा 'एन्काउंटर' अन् नाना पटोलेंचे पाच गंभीर प्रश्न

Akshay Sabale

बदलापूरमधील दोन चिमुरड्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा सोमवारी सायंकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षय याला दुसऱ्या एका गुन्ह्याप्रकरणी तळोजा कारागृहातून वाहनातून घेऊन येताना त्याने अधिकाऱ्याकडील पिस्तूल हिसकावून पोलिसांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय याचा मृत्यू झाला. अक्षयने झाडलेल्या गोळीनं एक पोलिस अधिकारी जखमी झाला. मात्र, याप्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

आरोपीला शिक्षा झाली पाहिजे होती. मात्र, आरोपी पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार करतो, ही गंभीर बाब असल्याचं नाना पटोले ( Nana Patile ) यांनी म्हटलं आहे. यासह नाना पटोले यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

नाना पटोले म्हणाले, "चिमुरड्यांवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला कायद्याने न्यायालयाच्या माध्यमातून कठोर शिक्षा झालीच पाहिजे होती. याबद्दल कुणाचेही दुमत असू शकत नाही. पण, एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना पोलिस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेऊन आरोपी गोळीबार करतो, ही बाब अत्यंत गंभीर आहे."

या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

  • पोलिस अधिकारी इतके बेसावध आणि निष्काळजीपणे आरोपींना घेऊन जातात का?

  • एक महिना उलटला तरीही बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही. वरिष्ठ पातळीवरून कोणाच्या तरी आदेशावरून त्या आरोपींना अटक करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे का?

  • फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का?

  • हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपीचे एन्काऊंटर केले आहे का?

  • पोलिस कस्टडीत आरोपींना संपवून प्रकरण दाबण्याचा उत्तरेतील राज्यातला पॅटर्न महाराष्ट्रात आणला जात आहे का?

"अक्षय शिंदे याच्या कुटुंबियांनीही पोलिसांनी पैसे घेऊन त्याची हत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी केली पाहिजे," अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT